रशियाच्या युद्धसरावातील भारताच्या सहभागावर अमेरिकेची चिंता

युद्धसरावातीलवॉशिंग्टन/बीजिंग – रशियाने आयोजित केलेल्या युद्धसरावातील भारताचा सहभाग ही चिंतेची बाब ठरते, असे अमेरिकेने म्हटले आहे. युक्रेनवर निर्दयी हल्ले चढविणाऱ्या रशियाने आयोजित केलेल्या रशियाबरोबरील युद्धसरावात इतर देशांनी सहभागी होणे, ही चिंताजनक बाब ठरते. पण या सरावात सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक देशाला आहे, असे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिवांनी म्हटले आहे. तर या युद्धसरावातील भारताच्या सहभागामुळे रशियाबरोबरील भारताचे संबंध अधिकच दृढ होतील, या भीतीमुळे अमेरिका नाराजी व्यक्त करीत असल्याचा शेरा चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने मारला आहे.

युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना, भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढविली. याबरोबरच भारत रशियाकडून कोळसा देखील खरेदी करीत आहे. तसेच भारत व रशिया आपला इंधनव्यवहार रुपया-रुबलमध्ये करीत असून यातून अमेरिकन डॉलर बाजूला पडला आहे. याचे लाभ दोन्ही देशांना मिळू लागले आहेत. मात्र अमेरिकेने भारताच्या इंधन खरेदीवर आक्षेप घेऊन रशियाबरोबरील हा व्यवहार रोखण्याचा शक्य तितका प्रयत्न करून पाहिला. मात्र आपल्या इंधनविषयक गरजांची जाणीव करून देऊन भारताने अमेरिकेसह युरोपिय देशांचा दबाव झुगारून दिला होता. युरोपिय देश भारताच्या कितीतरी अधिक पटीने रशियाकडून इंधनाची खरेदी करीत आहेत, अशा शब्दात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाश्चिमात्यांना फटकारले होते. यानंतर रशियाने आयोजित केलेल्या युद्धसरावातील भारताच्या सहभागावर अमेरिका आपली नाराजी प्रदर्शित करीत आहे.

व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरन जीन-पेरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आपल्या देशाचा आक्षेप नोंदविला. काही देश रशियाने आयोजित केलेल्या युद्धसरावात सहभागी होत आहेत, ही अमेरिकेसाठी चिंतेची बाब ठरते, असे कॅरन जीन-पेरी यांनी म्हटले आहे. मात्र हा आक्षेप नोंदवित असताना, प्रत्येक देशाला युद्धसरावात सहभागी होण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे कॅरन पुढे म्हणाल्या. यावरील आपली नाराजी अमेरिकेने व्यक्त केलेली आहे आणि हा विषय इथेच संपतो, असे सांगून कॅरन यांनी हा वाद अमेरिकेला अधिक पुढे न्यायचा नाही, असे स्पष्ट केले. अमेरिकेच्या या आक्षेपावर चीनकडून प्रतिक्रिया आली आहे. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने भारत व रशियाचे सहकार्य अधिकच भक्कम होईल, या चिंतेने अमेरिकेला ग्रासले आहे, असा दावा केला. म्हणूनच अमेरिका या युद्धसरावावर आक्षेप घेत असल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. रशियाने आयोजित केलेल्या ‘व्लादिवोस्तोक 2022’ युद्धसरावात भारत व चीनसह 13 देश सहभागी झाले आहेत.

युक्रेनचे युद्ध सुरू असताना, रशियाने आयोजित केलेल्या या युद्धसरावाला मिळालेला हा प्रतिसाद खरोखरच अमेरिकेला चिंतेत टाकणारा आहे. कारण युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाची आर्थिक व राजकीयदृष्ट्या नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका व मित्रदेशांनी जोरदार मोहीम हाती घेतली होती. यात आलेले अपयश अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाच्या जिव्हारी लागलेले आहे. युक्रेनच्या युद्धानंतर रशिया आर्थिक, राजकीय व लष्करीदृष्ट्याही अधिक मजबूत बनला असून रशियाला मिळणाऱ्या समर्थनात वाढ होत असल्याचे दावे अमेरिकन विश्लेषकच करीत आहेत. अगदी अमेरिकेचे निकटतम सहकाही मित्र व भागीदार देश देखील युक्रेनच्या मुद्यावर रशियाला विरोध करायला तयार नाहीत, याची जाणीव हे विश्लेषक बायडेन प्रशासनाला करून देत आहेत. अशा परिस्थितीत भारतासारखा महत्त्वाचा देश सारा दबाव झुगारून रशियाबरोबरील आपले पारंपरिक सहकार्य कायम ठेवत आहे, हे बायडेन प्रशासनाचे अपयश ठरते. म्हणूनच त्यावर नाराजी व्यक्त करून पुन्हा एकदा बायडेन प्रशासनाने भारतावर दबाब टाकण्याचा आणखी एक प्रयत्न करून पाहिल्याचे दिसत आहे.

leave a reply