उत्तर कोरियाच्या लढाऊ व बॉम्बर विमानांची दक्षिण कोरियाजवळ गस्त

सेऊल – उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील तणाव वाढत चालला आहे. गुरुवारी उत्तर कोरियाच्या 12 लढाऊ व बॉम्बर विमानांनी दक्षिण कोरियाच्या हवाई हद्दीजवळ धडक मारली. उत्तर कोरियाच्या या अरेरावीविरोधात दक्षिण कोरियाने 30 विमाने रवाना करून आपल्या शेजारी देशाला इशारा दिला. दोन दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केल्यानतर दक्षिण कोरियाने चार क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. दरम्यान, अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या नौदलाने जपानच्या समुद्रात नवा युद्धसराव सुरू केला आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेची अजस्त्र विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रोनाल्ड रिगन’ दक्षिण कोरियाच्या बुसान बंदरात दाखल झाली. तेव्हापासून दोन्ही कोरियन देशांमधील तणाव वाढला आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नौदलाने यलो सीच्या क्षेत्रात सराव केल्यामुळे खवळलेल्या उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावला होता. गेल्या दहा दिवसांमध्ये उत्तर कोरियाने सहा वेळा क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या. यापैकी एका क्षेपणास्त्राने जपानची हवाईहद्द ओलांडल्यानंतर, खळबळ माजली होती.

अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्राने जपानच्या सुरक्षेला आव्हान दिल्यानंतर अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौका या क्षेत्रात तैनात केली होती. यावर संतापलेल्या उत्तर कोरियाने पुन्हा दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केल. तर दक्षिण कोरियाने जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या चार क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करून आपल्या शेजारी देशाला प्रत्युत्तर दिले होते. यामुळे अधिकच आक्रमक झालेल्या उत्तर कोरियाने गुरुवारी सकाळी पुन्हा दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली.

याला काही तास उलटत नाही तोच, उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या दिशेने आठ लढाऊ व चार बॉम्बर विमानांचे पथक रवाना केले. तर उत्तर कोरियाकडून अशा स्वरुपाच्या चिथावणीखोर कारवायांची अपेक्षा असलेल्या दक्षिण कोरियाने आपली 30 लढाऊ विमाने प्योंगँगच्या दिशेने रवाना केली. आजवर उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक कारवायांना दक्षिण कोरियाने त्याच भाषेत उत्तर देण्याचे टाळले होते. पण दक्षिण कोरियात झालेल्या सत्ताबदलानंतर या देशाची सूत्रे हाती घेणाऱ्या राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी उत्तर कोरियाविरोधात कठोर भूमिका स्वीकारली आहे. दक्षिण कोरियाच्या या आक्रमकतेला अमेरिकेचे समर्थन मिळत आहे.

शुक्रवारी अमेरिकेने दक्षिण कोरिया व जपानच्या नौदलाबरोबर आणखी एक सराव सुरू केला. उत्तर कोरियाच्या पूर्वेकडील ‘सी ऑफ जपान’ या सागरी क्षेत्रात हा सराव पार पडला आहे. गेल्या दहा दिवसात या तीनही देशांच्या नौदलातील हा दुसरा सराव ठरतो. उत्तर कोरियापासून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या प्रमुखांची भेट घेतली.

दरम्यान, क्षेपणास्त्र चाचण्यांची तीव्रता वाढवून उत्तर कोरिया अणुचाचणीची तयारी करीत असल्याचा दावा केला जातो. पण चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची बैठक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, उत्तर कोरिया अणुचाचणी करून चीनसमोरील अडचणी वाढविणार नसल्याचेही विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply