इस्रायलने सुरू केलेल्या युद्धाचा इराण अंत करील

- इराणच्या वरिष्ठ कमांडरची घोषणा

इराण अंत करीलतेहरान – इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला चढविण्यासाठी आवश्यक असलेली सज्जता आणि हालचाली इस्रायलने वाढविल्याचा इशारा इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी काही तासांपूर्वी दिला होता. यावर इराणची प्रतिक्रिया आली आहे. ‘इस्रायल इराणवर हल्ला चढवून युद्धाला तोंड फोडू शकतो, पण त्यानंतर पेटणार्‍या युद्धाचा अंत इराणच करील. इस्रायलचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही’, अशी घोषणा इराणच्या एरोस्पेस फोर्स कमांडचे प्रमुख ब्रिगेडिअर जनरल अमीर अली हाजीझदेह यांनी केली.

येत्या काळात इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवरील कारवाईची शक्यता बळावल्याचा इशारा इस्रायल देत आहे. इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार्‍या सिरिया, लेबेनॉनमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवर कारवाई करणार असल्याचे इस्रायलने जाहीर केले आहे. त्याचबरोबर इराणच्या अणुकार्यक्रमापासूनही इस्रायलच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगून इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी संबंधित अणुप्रकल्पांवर हल्ला चढविण्याची घोषणा इराणने केली होती.

याला उत्तर देताना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्समधील एरोस्पेस फोर्सचे प्रमुख ब्रिगेडिअर जनरल हाजीझदेह यांनी इस्रायलला धमकावले. ‘बढाया मारणार्‍या इस्रायलचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर इस्रायल इतर देशांच्या विनाशाच्या घोषणा देऊ शकणार नाही’, अशी धमकी ब्रिगेडिअर जनरल हाजीझदेह यांनी दिली. यइराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमापासून शत्रूदेश घाबरत असल्याचे हाजीझदेह म्हणाले.

इराण अंत करील‘इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे सामर्थ्य कितीतरीपटीने वाढले आहे. म्हणूनच इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत वाटाघाटी करण्यासाठी शत्रू देश प्रयत्न करीत आहेत’, असा दावा हाजीझदेह यांनी केला. इराणच्या लष्करी अधिकार्‍यांनी उघड उल्लेख टाळला असला तरी अमेरिका व युरोपिय देशांना उद्देशून हा शेरा मारल्याचे दिसत आहे.

इराणबाबत अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने स्वीकारलेल्या बोटचेपे धोरणांमुळे इस्रायल, सौदी अरेबिया या अमेरिकेच्या सहकारी देशांमध्ये अविश्‍वास वाढत चालल्याची टीका अमेरिकेच्या विरोधी पक्षनेत्यांकडून केली जाते. इराण अणुबॉम्ब मिळविण्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलेला असताना देखील बायडेन प्रशासन इराणवर कारवाई करण्याचे टाळत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले देखील इस्रायलला इराणवर एकतर्फी कारवाई करण्याची तयारी ठेवण्याचा सल्ला देत आहेत. त्यांच्या या भूमिकेला अमेरिकेतील इस्रायलसमर्थक नेत्यांकडून समर्थन मिळत आहे. अशा परिस्थितीत, इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी केलेली घोषणा व त्यावर इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी दिलेल्या धमकीचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

leave a reply