अमेरिकेतील तीन प्रांतांमध्ये ‘मंकीपॉक्स इमर्जन्सी’ची घोषणा

- रुग्णांची एकूण संख्या सहा हजारांवर

‘मंकीपॉक्स इमर्जन्सी’वॉशिंग्टन – अमेरिकेत मंकीपॉक्स व्हायरसचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असून देशातील तीन प्रांतांमध्ये ‘इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली. यात न्यूयॉर्क, कॅलिफोनिया व इलिनॉयस यांचा समावेश आहे. अमेरिकेतील एकूण रुग्णसंख्येपैकी जवळपास ५० टक्के रुग्ण या तीन प्रांतांमध्ये आहेत. अमेरिकेतील एकूण रुग्णसंख्या सहा हजारांवर गेली असून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी साथीचर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष ‘कोऑर्डिनेटर’ची नियुक्ती केली आहे. चाचण्या तसेच लसींचा अभाव यामुळे अमेरिकेत मंकीपॉक्सचा फैलाव वाढत असल्याची चिंता आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली.

‘मंकीपॉक्स इमर्जन्सी’काही दिवसांपूर्वीच ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्स ही ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ असल्याचे जाहीर केले होते. अमेरिका व युरोपिय देशांसह आफ्रिकेतील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी ७० देशांमध्ये ही साथ पसरल्याचे आढळले होते. बुधवारी अमेरिकेच्या ‘सीडीसी’ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्सची साथ जगभरातील ८३ देशांमध्ये पसरली असून एकूण रुग्णसंख्या २५ हजारांवर पोहोचली आहे. त्यातील ६,३२६ रुग्ण एकट्या अमेरिकेतील आहेत. अमेरिकेत सध्या प्रतिदिनी २००हून अधिक रुग्ण आढळत असून पुढील काही आठवड्यात ही संख्या दुपटीने वाढू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

‘मंकीपॉक्स इमर्जन्सी’गेल्याच महिन्यात, अमेरिकेत झालेला ‘मंकीपॉक्स व्हायरस’चा उद्रेक नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे, असा इशारा आघाडीच्या आरोग्यतज्ज्ञांनी दिला होता. ‘आफ्रिकेत वाढणारी रुग्णसंख्या हा आपल्यासाठी इशारा होता. पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले. आता काहीतरी ठोस करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही एका ठिकाणी संसर्ग आढळणे याचा अर्थ सर्व ठिकाणी फैलाव असू शकतो, असा होऊ शकतो’, या शब्दात अमेरिकेतील डॉ. ॲन रिमोईन यांनी मंकीपॉक्सच्या वाढत्या धोक्याबाबत इशारा दिला. त्याचवेळी ‘मंकीपॉक्स व्हायरस’चा संसर्ग रोखण्यासाठी असलेली संधी हातातून निसटत चालल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. तर ‘नॅशनल कोएलिशन ऑफ एसटीडी डायरेक्टर्स’चे संचालक डेव्हिड हार्वे यांनी अमेरिकेकडे पुरेशा लसी उपलब्ध नाहीत, अशी टीका केली आहे. अमेरिकेतील काही शहरांमध्ये लसींच्या टंचाईवरून निदर्शने झाल्याचेही समोर आले आहे.

मे महिन्यात आफ्रिका खंडातील नायजेरियामधून ब्रिटनमध्ये आलेल्या एका व्यक्तीला ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये मंकीपॉक्सची साथ ८०हून अधिक देशांमध्ये पसरली आहे.

leave a reply