इराणने चुकीची पावले उचलू नयेत

- अमेरिकेच्या सेंटकॉमच्या प्रमुखांचे आवाहन

मस्कत/तेहरान – ‘२०१५ सालचा अणुकरार वाचविण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी सर्वांनीच विवेकपूर्ण आणि सावधानतेने पावले उचलावी. परस्परांवरील विश्‍वास वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, इराणने चुकीची पावले उचलू नये’, असे आवाहन अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी केले. हे आवाहन करीत असताना, मॅकेन्झी यांनी अमेरिका कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची जाणीव इराणला करून दिली आहे. गेल्याच आठवड्यात सेंटकॉमच्या प्रमुखांनी सौदी अरेबियामध्ये अमेरिकेने अतिरिक्त तळांचा वापर सुरू करावा, असे सुचविले होते. इराणबरोबरचा तणाव वाढला तर अमेरिकेला या तळांची आवश्यकता भासू शकते, असे सूचक उद्गार जनरल मॅकेन्झी यांनी काढले होते.

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने इराणबरोबर अणुकरार करण्याची तयारी व्यक्त केली. यासाठी इराणशी वाटाघाटी सुरू केल्याच्या बातम्याही समोर येत आहे. त्याचबरोबर इराणच्या ताब्यातील अमेरिकी नागरिकांच्या सुटकेसाठीही बोलणी सुरू असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवॅन यांनी दिली. इराणनेही अणुकराराबाबत युरोपिय महासंघाने दिलेल्या प्रस्तावावर अभ्यास सुरू असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेने आखाती देशांसाठी उभारलेल्या ‘सेंट्रल कमांड – सेंटकॉम’चे प्रमुख जनरल मॅकेन्झी या क्षेत्रातील अमेरिकेच्या मित्रदेशांच्या दौर्‍यावर आहेत.

ओमानच्या भेटीवर असताना जनरल मॅकेन्झी यांनी मुलाखतीदरम्यान इराणला सदर आवाहन केले. ‘या क्षेत्रातील जबाबदार देश म्हणून ओळख हवी असेल तर इराणने आपल्या घातक कारवाया रोखायला हव्या. कारण असे केले तरच परस्परांवरील विश्‍वास वाढेल’, असे मॅकेन्झी म्हणाले. आपल्या या मुलाखतीवेळी सेंटकॉमच्या प्रमुखांनी लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून होर्मुझच्या आखाताजवळून गस्त घातली. त्याचबरोबर इराणच्या ताब्यातील केशम बेटावरुन उड्डाण करताना, ‘आजचा दिवस धुक्याने भरलेला आहे, पुढचे काहीही दिसत नाही’, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर जनरल मॅकेन्झी यांनी ओमानच्या खासाब नौदल तळाला भेट दिली.

त्याचबरोबर अमेरिकेने अणुकरार केला तरी इराण जनरल कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेईल, अशी चिंताही अमेरिकेच्या सेंटकॉमच्या प्रमुखांनी व्यक्त केली. ‘इराण सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे इराणचा धोका टळलेला नाही. असे असले तरी आपल्या जवानांच्या सुरक्षेसाठी अमेरिका कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे’, याची जाणीव जनरल मॅकेन्झी यांनी करुन दिली.

अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख इराणला सदर आवाहन करीत असताना, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी इराणला तातडीची भेट दिली. इराणने अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांना अणुप्रकल्पांमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याची घोषणा केली होती. या पार्श्‍वभूमीवर, या देशाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी ग्रॉसी यांनी इराणचा दौरा केला. अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांना मर्यादित प्रवेश देण्याचे इराणने मान्य केले आहे. पण पुढील तीन महिन्यांपर्यंतच निरिक्षकांना ही मुभा असेल, असे इराणने फटकारले आहे. दरम्यान, इराणच्या दोन अणुप्रकल्पांमध्ये संशयास्पद युरेनियमचे अंश सापडल्याचा दावा अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांनी केला आहे. अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली. काही दिवसांपूर्वी इराणने अणुकराराचे उल्लंघन करीत मर्यादेपलिकडे युरेनियमचे संवर्धन सुरू केले होते.

leave a reply