अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या पाच लाखांनजिक

वॉशिंग्टन – अमेरिकेत कोरोनाच्या साथीत बळी पडणार्‍यांची संख्या पाच लाखांनजिक पोहोचली आहे. अमेरिकी संशोधन संस्थेने डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात एप्रिल महिन्यापर्यंत, अमेरिकेतील बळींची संख्या पाच लाख ३९ हजारांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज वर्तविला होता. दरम्यान, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे प्रमुख आरोग्य सल्लागार अँथनी फॉसी यांनी २०२२ सालामध्येही ‘मास्क’चा वापर करणे भाग पडेल, असे बजावले आहे.

गेल्या महिन्याभरात अमेरिकेतील रुग्णांची व बळींची संख्या टप्प्याटप्प्याने घटत असल्याचे समोर येत आहे. यामागे काही प्रमुख राज्यांमध्ये नव्याने लादण्यात आलेले निर्बंध व लसीकरणाची मोहीम हे घटक कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे. मात्र असे असले तरी जागतिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेसारख्या प्रगत देशात कोरोनाच्या बळींची संख्या पाच लाखांजवळ पोहोचणे ही बाब साथीची व्याप्ती व भयावहता दाखवून देणारी ठरत आहे.
अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचा भाग असलेल्या ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अ‍ॅण्ड इव्हॅल्युएशन’ने (आयएचएमई) गेल्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातील अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात पुढील चार महिन्यात अमेरिकेसह जगभरात कोरोनाच्या साथीत बळी जाणार्‍यांची संख्या दुपटीने वाढू शकते, असा इशारा देण्यात आला होता.

लसीकरणाला व्यापक स्वरुपात सुरुवात झाल्यानंतरही त्याचे परिणाम दिसून येण्यास काही काळ जावा लागेल, ही बाब लक्षात घेऊन बळींबाबत अंदाज वर्तविण्यात आल्याची माहिती त्यावेळी ‘आयएचएमई’ने दिली होती. हा अंदाज जवळपास खरा ठरत असल्याचे फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. ‘आयएचएमई’ने आपल्या अहवालात लसीकरणापेक्षा मास्कचा वापर कोरोनाच्या साथीची व्याप्ती कमी करण्यात अधिक फायदेशीर ठरु शकतो, असाही दावा केला होता. दरम्यान, अमेरिकेचे प्रमुख आरोग्यविषयक सल्लागार डॉक्टर फॉसी यांनी, कोरोनापासून बचाव करण्यासाठी २०२२ सालीही मास्कचा वापर करावा लागू शकतो, असे संकेत दिले आहेत. मास्कचा वापर ही बाब ‘न्यू नॉर्मल’ ठरु शकतो, असेही फॉसी यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील बहुसंख्य जनतेला लस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ‘मास्क’ व इतर निर्बंध मागे घेतले जाऊ नयेत, असा सल्लाही आरोग्यविषयक सल्लागारांनी दिला.

जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११ कोटी, १५ लाखांवर गेली असून २४ लाख, ६८ हजार, ४११ जणांचा बळी गेल्याची माहिती ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन’कडून देण्यात आली आहे. अमेरिकेव्यतिरिक्त ब्राझिल, मेक्सिको, भारत व ब्रिटनमध्ये एक लाखांहून अधिक जण दगावल्याचे समोर आले आहे.

leave a reply