इराणला अणुकराराबाबत अंतिम प्रस्ताव दिला आहे

- युरोपिय महासंघाचा कडक इशारा

अंतिम प्रस्तावव्हिएन्ना – इराण आणि युरोपिय महासंघाच्या अधिकाऱ्यांमध्ये व्हिएन्ना येथे पार पडलेल्या बैठकीत 2015 सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी आणखी एक प्रयत्न झाला. महासंघाने इराणसमोर अणुकरारासंबंधी अंतिम प्रस्ताव दिला आहे. इराणने याबाबत फक्त आपला निर्णय कळवायचा आहे. सदर प्रस्तावात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, अशा स्पष्ट शब्दात युरोपिय महासंघाने इराणला इशारा दिला. इराणने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर घसरले असून ही सूचक बाब ठरते आहे.

गेल्या आठवड्यात युरोपिय महासंघाने इराण आणि अमेरिकेला अणुकराराबाबत वाटाघाटींसाठी नव्याने आवाहन केले होते. यानंतर अमेरिका व इराणचे प्रतिनिधी व्हिएन्ना येथील अप्रत्यक्ष बैठकीत सहभागी झाले. युरोपिय महासंघाचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी जोसेफ बोरेल यांनी मंगळवारी या बैठकीनंतर अमेरिका व इराणसमोर अणुकरारासंबंधी प्रस्ताव ठेवला. हा अंतिम प्रस्ताव असून इराण आणि अमेरिकेने त्वरीत यावर आपला निर्णय द्यावा, अशा स्पष्ट शब्दात बोरेल यांनी दोन्ही देशांना बजावले.

अंतिम प्रस्ताव‘या अणुकरारामध्ये आवश्यक असलेले सर्व मुद्दे या प्रस्तावात सामील करण्यात आले आहेत. आता अमेरिका व इराणच्या नेतृत्वाने या प्रस्तावावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे. उत्तर हो किंवा नाही, अशा स्वरुपात असले पाहिजे. कारण या प्रस्तावात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही’, अशा कडक शब्दात बोरेल यांच्या कार्यालयाने इराणला इशारा दिला. अमेरिका व इराणने यावर त्वरीत निर्णय घ्यावा, असे बोरेल यांनी सुचविले आहे.

महासंघाने तयार केलेल्या या प्रस्तावातील मुद्दे किंवा मागण्यांबाबत कुठलाही खुलासा झालेला नाही. पण युरोपिय महासंघाने अणुकराराबाबत अतिशय कठोर भूमिका स्वीकारल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. या प्रस्तावाचा अभ्यास सुरू असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले. तसेच लवकरच या प्रस्तावावरील आपला निर्णय आणि मागण्या कळविण्यात येईल, असे सदर इराणी अधिकाऱ्याने स्पष्ट केले. पण महासंघ सदर प्रस्तावावरील कुठल्याही प्रकारच्या दुरूस्तीसाठी तयार नसल्याचा दावा केला जातो. अणुकरारासाठी उत्सूक असलेल्या बायडेन प्रशासनाकडूनही या नव्या प्रस्तावावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

दरम्यान, युरोपिय महासंघाने अणुकराराबाबत अंतिम प्रस्तावाची घोषणा करून इराणवर दबाव टाकल्याचे संकेत दिले आहेत खरे. पण इराण हा ‘खोटा दबाव’ देखील सहन करणार नाही, असा दावा इस्रायलने केला. महासंघाने दिलेला हा प्रस्ताव देखील इराण स्वीकारण्याची शक्यता धूसर असल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र अणुकरारावरील या वाटाघाटीही फिस्कटल्या तर बायडेन प्रशासनाला फार मोठा धक्का बसू शकतो.

leave a reply