एलएसीवरील परिस्थिती स्थीर, तरीही अनिश्चित

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

LAC-remains-stable

नवी दिल्ली – चीनलगतच्या सीमेवरील परिस्थिती सध्या स्थीर असली तरी अनिश्चित आहे. इथे कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याची पूर्ण सज्जता भारतीय लष्कराने ठेवलेली आहे. चीनने एलएसीवरील आपल्या लष्कराची तैनाती काही प्रमाणात वाढविलेली असली, तरी भारतीय लष्कर त्यावर नजर ठेवून त्यानुसार यथोचित हालचाली करीत आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी म्हटले आहे. त्याचवेळी चीनबरोबर राजनैतिक तसेच लष्करी पातळीवर भारताची चर्चा सुरू असल्याचे सांगून एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही लष्करप्रमुखांनी दिली.

Manoj Pande addresses press9 डिसेंबर रोजी चीनने तवांगच्या एलएसीवरील क्षेत्रात घुसखोरीचा प्र्रयत्न केल्यानंतर, दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. कुठल्याही परिस्थितीत एलएसीवरील यथास्थिती चीनला बदलू देणार नाही, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आणि भारतीय नेत्यांनी देखील चीनला खरमरीत शब्दात या वास्तवाची जाणीव करून दिली होती. त्यानंतरच्या काळात चीनने भारताबरोबरील सीमावाद सामोपचाराने मिटविण्याचे दावे करून नरमाईची भूमिका स्वीकारली. पण तुमच्या शब्दांवर नाही, तर कारवायांकडे आपले लक्ष असेल, याची जाणीव भारताचे लष्कर आणि नेते देखील चीनला करून देत आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलताना, भारत व चीनचे संबंध सुरळीत नाहीत, याची जाणीव करून देत आहेत. तर चीन भारताबरोबरील आपला तणाव नसल्याचे भ्रामक चित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर उभे करू पाहत आहे.

अशा परिस्थितीत लष्कर दिनाच्या आधी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी चीनच्या सीमेवरील परिस्थितीची माहिती देशवासियांना दिली. माध्यमांशी बोलताना जनरल पांडे यांनी एलएसीवरील परिस्थिती सध्या स्थीर आहे, पण इथे अनिश्चिततेचे अर्थात कधी काय होईल, ते सांगता येणार नाही, असे वातावरण असल्याचे स्पष्ट केले. अशा परिस्थितीत भारतीय लष्कराने आक्रमक पवित्रा स्वीकारला असून कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याची सज्जता लष्कराने ठेवलेली आहे, असे जनरल पांडे पुढे म्हणाले. भारतीय लष्कराची सिद्धता उच्च पातळीवर असल्याचे सांगून चीनच्या तैनातीला टक्कर देण्यातकी तैनाती भारतानेही एलएसीवर करून ठेवलेली आहे, याकडे लष्करप्रमुखांनी लक्ष वेधले.

एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करी तसेच राजनैतिक पातळीवरही वाटाघाटी सुरू आहेत. एसएसीवरील सात विवाद्य मुद्यांपैकी पाच मुद्यांवरील वाद मिटविण्यात यश आले आहे. तर दोन मुद्यांवर अजूनही चर्चा सुरू आहे, अशी माहिती जनरल पांडे यांनी दिली. भारतीय लष्कराच्या तैनातीचा धोरणात्मक समतोल साधण्याचे काम देखील पूर्ण झाल्याचे सांगून या तैनातीसाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी भारतीय लष्कराकडून उत्तमरित्या केली जाते, याकडेही लष्करप्रमुखांनी लक्ष वेधले. दरम्यान, लडाखच्या एलएसीवर कडक हिवाळ्याचा सामना करणे चीनच्या जवानांसाठी अवघड बनल्याचे गेल्या वर्षी उघड झाले होते. त्या पार्श्वभूमीवर जनरल पांडे यांनी केलेली ही विधाने महत्त्वाची ठरतात.

भारत आणि चीनमधील सीमावाद व इथे निर्माण झालेल्या तणावाची दखल साऱ्या जगाने घेतली असून बलाढ्य मानल्या जाणाऱ्या चीनच्या लष्कराला भारतीय सैनिकांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले, याची दखल प्रमुख देशांनी घेतली होती. तसेच चीनचे लष्कर अनेक गोष्टींसाठी सज्ज नसून या लष्कराकडे व्यावसायिकता नसल्याची बाबही भारताबरोबरील संघर्षामुळे जगासमोर आली होती. याचा परिणाम चीन धमकावत असलेल्या इतर देशांवर झाला असून या देशांचा आत्मविश्वास अधिक वाढल्याचे दिसत आहे. भारतीय सैनिकांनी एलएसीवर घुसखोरी करू पाहणाऱ्या चीनच्या जवानांना चांगलेच चोपल्याचा व्हिडिओ काही आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. तो व्हिडिओ प्रसारित करून तैवानच्या वृत्तवाहिन्यांनी चीनच्या लष्कराची खिल्ली उडविली होती. त्याचवेळी तैवानी जवानांना भारताने आपल्याकडे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी तैवानमधून करण्यात आली होती.

हिंदी English

leave a reply