चीनमधील कोरोना साथीची माहिती उघड करणार्‍या पत्रकाराला तुरुंगवास

बीजिंग – चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरस साथीची माहिती विस्ताराने समोर आणणार्‍या पत्रकार ‘झँग झॅन’ यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मूळच्या वकील असणार्‍या झॅन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला वुहानला भेट देऊन कोरोनाच्या साथीने उडविलेला हाहाकार ‘लाईव्ह रिपोर्टस्’ व लेखांच्या माध्यमातून उघड केला होता. मात्र सार्वजनिक स्थळी वाद घालणे व तणावासाठी चिथावणी देणे, अशी कारणे पुढे करून चीनच्या न्यायालयाने त्यांना तुरुंगात धाडले आहे. झॅन यांच्यापूर्वी कोरोनाची माहिती उघड करणार्‍या आठजणांना चीनच्या राजवटीने तुरुंगात डांबले होते.

तुरुंगवास

गेल्या वर्षाच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरातून कोरोनाव्हायरसच्या साथीला सुरुवात झाली होती. मात्र चीनच्या सत्ताधार्‍यांनी हे वास्तव आंतरराष्ट्रीय समुदायापासून दडपण्याचा प्रयत्न केला. वुहानमधील कार्यकर्ते, लेखक, संशोधक तसेच इतर भागातील ‘सिटिझन जर्नलिस्ट्स’नी वुहानमधील सत्य व्हिडिओ तसेच लेखांच्या माध्यमातून समोर आणण्यास सुरुवात केली. यात चिनी लेखिका ‘फँग फँग’, मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग व हाँगकाँगमधील संशोधिका डॉ. ली-मेंग यान यासारख्यांचाही समावेश आहे. जेनिफर झेंग व डॉ. यान परदेशात वास्तव्यास असून ‘फँग फँग’ यांच्या ‘वुहान डायरी’वर चीनने बंदी घातली होती.

त्याचवेळी वुहानचे वास्तव समोर आणणारे अनेक पत्रकार फेब्रुवारी महिन्यानंतर बेपत्ता झाले आहेत. काही पत्रकार व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कारणांवरून तुरुंगात टाकण्यात आले असून, ‘झँग झॅन’ यांच्यावरील कारवाईही त्याचाच भाग ठरतो. झॅन यांना शांघायमधील न्यायालयाने चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. झॅन यांनी यापूर्वीच सत्ताधारी राजवटीच्या कारवाईविरोधात उपोषण सुरू केले होते. त्यांची प्रकृती खालावली असून तुरुंगातच आपला मृत्यू होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केल्याचे वकिलांनी सांगितले.

चीनच्या सत्ताधारी राजवटीने गेले काही महिने कोरोनाव्हायरसच्या मुद्यावर आपला बचाव करण्यासाठी आक्रमक मोहीम छेडली आहे. त्यासाठी साथीची सुरुवातीपासून उपलब्ध असलेली माहिती दडपणे, माहिती देणार्‍यांवर कारवाई करणे, चीनच्या उपाययोजनांबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रचार करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. चीनच्या राजवटीकडून कोरोनाविरोधात विकसित केलेल्या लसीचा वापर करून आपली प्रतिमा सुधारण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध देशांना माफक दरात तसेच सहाय्याच्या रुपात लसही पुरविली जात आहे.

हे प्रयत्न सुरू असतानाच जागतिक आरोग्य संघटनेचे पथक पुढील महिन्यात चीनमध्ये दाखल होणार असल्याचे सांगण्यात येते. चीनच्या वुहानमधून सुरू झालेल्या साथीचा मोठा फटका बसलेल्या अनेक देशांनी साथीच्या उगमाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली होती. अमेरिका, युरोपिय देश व ऑस्ट्रेलियाने यासाठी पुढाकार घेतला होता.

त्यानुसार, वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असलेले पथक चीनमधून वुहान साथीबाबताची माहिती गोळा करणार आहे. साथ सुरू झाल्यानंतरच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने चीनच्या दबावाखाली अनेक निर्णय घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे चीनमध्ये दाखल होणार्‍या पथकाकडून वास्तव माहिती समोर येण्याची अपेक्षा नसल्याचे विश्‍लेषकांकडून सांगण्यात येत आहे.

leave a reply