इराकमध्ये सद्र व इराण समर्थकांमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता बळावली

- ‘ग्रीन झोन’मध्ये इराकी लष्कराचा कडेकोट बंदोबस्त

सद्रबगदाद – इराकमधील ‘मुक्तदा अल-सद्र’च्या समर्थकांनी इराणसमर्थक राजकीय पक्षाविरोधात पुकारलेल्या या निदर्शनाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. यामुळे इराकची राजधानी बगदादमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता बळावली असून पंतप्रधान कधीमी यांनी लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यासाठी निदर्शकांवर कारवाई करण्याची परवानगी इराकच्या पंतप्रधानांनी दिली आहे. तर इराणसमर्थक गटांनी देखील सद्र गटाविरोधात निदर्शने सुरू करून संसदेला वेढा घालण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या आठवड्यात इराकमध्ये जनतेच्या असंतोषाचा उद्रेक झाला. इराकच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुक्तदा अल-सद्र यांच्या राजकीय पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तरीही इराकच्या राजकारणात प्रभावी असलेल्या इराणसमर्थक गटांनी सद्र यांना सत्ता स्थापन करण्यास अटकाव केला. यामुळे संतापलेल्या सद्र यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात इराकच्या संसदेत घुसखोरी केली होती. पण अल-सद्र आणि इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कधीमी यांनी आवाहन केल्यानंतर निदर्शकांनी संसद रिकामे केले होते. पण शनिवारी पुन्हा एकदा सद्र समर्थक निदर्शकांनी इराकी संसदेत घुसखोरी करून ठिय्या मांडला आहे.

सद्रइराकच्या राजकारणात अमेरिका किंवा इराणसमर्थक पक्ष, नेत्यांना स्थान असू नये, अशी सद्र पक्षाची मुख्य मागणी आहे. त्याचबरोबर कुठलाही भेदभाव न करता इराकमधील सर्व दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचे सद्र समर्थकांनी सुचविले आहे. या आपल्या मागण्या मान्य केल्याखेरीज माघार घेणार नसल्याचे सद्र समर्थकांचे म्हणणे आहे. पण इराकमधील इराणसमर्थक गटांनी देखील बगदादच्या रस्त्यावर उतरून सद्र समर्थकांविरोधात निदर्शने करण्याचे जाहीर केले आहे.

स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजल्यापासून इराणसमर्थक गटाची ही निदर्शने सुरू होतील. इराकच्या जनतेने देखील आपल्या या निदर्शनविरोधी निदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन इराणसमर्थक गटाने केले. या निदर्शनात इराणसमर्थक ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स’ ही दहशतवादी संघटना देखील सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. याची दखल घेऊन मुक्तदा अल-सद्रने देखील आपल्या समर्थकांना राजधानी बगदादपर्यंत मर्यादित न राहता इराकच्या पाचही प्रांतात इराणसमर्थक गटांविरोधात निदर्शने पुकारण्याची सूचना केली आहे.

दरम्यान, या दोन्ही गटांच्या आक्रमकतेमुळे इराकमध्ये संघर्ष पेटू शकतो, असे दावे आखाती माध्यमे करीत आहेत. या संघर्षाचे पर्यावसन गृहयुद्धात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे इराकमधील विश्लेषकांचे म्हणणे आहे. पंतप्रधान कधीमी यांनी लष्कर तैनात केले असले तरी इराकमध्ये एकमेकांविरोधात ठाकलेले दोन्ही गट प्रभावी मानले जातात. त्यामुळे इराकमध्ये गृहयुद्ध पेटलेच तर त्याचा परिणाम इराण, तुर्की तसेच कुवैच्या सीमेवरही होऊ शकतो. असे झाले तर या क्षेत्रातील इंधन पुरवठा बाधित होऊन जगभरातील इंधनाच्या संकटात भर पडू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

leave a reply