दक्षिण कोरियाकडून अमेरिकन अण्वस्त्रांच्या तैनातीची मागणी

स्थानिक वर्तमानपत्राचा दावा

सेऊल – उत्तर कोरियापासून असलेला धोका अधोरेखित करून दक्षिण कोरिया अमेरिकेबरोबर आण्विक भागिदारी करण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत दक्षिण कोरिया अमेरिकेकडे अजस्त्र विमानवाहू युद्धनौका आणि आण्विक पाणबुडीच्या तैनातीची मागणी करू शकतो, असा दावा ‘चोसून इल्बो’ या कोरियन वर्तमानपत्राने केला. दक्षिण कोरियाची ही मागणी उत्तर कोरियाच्या आक्रमक कारवाईला निमंत्रण देणारी ठरेल, असा दावा केला जातो. कारण अमेरिकी विमानवाहू युद्धनौकेच्या सेऊलमधील तैनातीनंतरच उत्तर कोरियाने या क्षेत्रात क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांचा सपाटा लावला आहे, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

biden yeol nuclear sharingराष्ट्राध्यक्ष येओल यांनी दक्षिण कोरियाची सूत्रे हातात घेतल्यापासून आक्रमक लष्करी निर्णय घेतले आहेत. याअंतर्गत गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच दक्षिण कोरियाने अमेरिकेच्या लष्कराला युद्धसरावासाठी आमंत्रण दिले होते. तर गेल्याच आठवड्यात दक्षिण कोरियाच्या नौदलाने अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेबरोबर आत्तापर्यंतचा या क्षेत्रातील सर्वात मोठा सराव केला. तसेच दक्षिण कोरिया जपानबरोबरही नवे लष्करी सहकार्य प्रस्थापित करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

राष्ट्राध्यक्ष येओल यांच्या या आक्रमक लष्करी धोरणातील पुढचे पाऊल म्हणून दक्षिण कोरियात अमेरिकेबरोबर आण्विक भागिदारी करणार असल्याचे कोरियन वर्तमानपत्राने म्हटले आहे. ‘उत्तर कोरियाने सातवी अणुचाचणी केली तर दक्षिण कोरियाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन दक्षिण कोरिया अमेरिकेबरोबर आण्विक तैनातीबाबत चर्चा करीत आहे’, अशी माहिती कोरियन सरकारमधील अधिकाऱ्याने दिली.

याअंतर्गत जपानप्रमाणे अमेरिकेची अणुऊर्जेवर आधारीत विमानवाहू युद्धनौका दक्षिण कोरियातही तैनात असेल. तसेच अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीला देखील कोरियन क्षेत्रातील तैनातीसाठी विचारणा केल्याचे सदर अधिकाऱ्याने सांगितले. दक्षिण कोरियातील अमेरिकेच्या सैन्यतैनातीला याआधीच उत्तर कोरियाने कडाडून विरोध झाला होता. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष येओल यांनी अमेरिकी युद्धनौका व पाणबुडीच्या तैनातीबाबत करार केला तर उत्तर कोरियाकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते, असा दावा लष्करी विश्लेषक करीत आहेत.

leave a reply