आर्मेनिया-अझरबैजान युद्धात पाकिस्तानी जवान अझरबैजानसाठी लढत असल्याचा दावा

इस्लामाबाद/बाकु – गेल्या काही दिवसांपासून मध्य आशियातील आर्मेनिया-अझरबैजानमध्ये भडकलेल्या युद्धात पाकिस्तान अझरबैजानच्या समर्थनार्थ उतरल्याची माहिती समोर आली आहे. ‘नागोर्नो-कॅराबख’ या स्वायत्त प्रांताचा भाग असणाऱ्या ‘अगदम’ शहरात पाकिस्तानी जवान तैनात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांच्या संभाषणातून उघड झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानच्या संसदेतही अझरबैजानला पाठिंबा देणारा व आर्मेनियाची निंदा करणारा ठरावही करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या अझरबैजानमधील राजदूतांनीही ‘कॅराबख इज अझरबैजान’ या शब्दात पाकिस्तान पाठीशी असल्याची ग्वाही दिली आहे.

आर्मेनिया-अझरबैजान युद्धात पाकिस्तानी जवान अझरबैजानसाठी लढत असल्याचा दावारविवारपासून आर्मेनिया-अझरबैजानमध्ये सुरू असलेले युद्ध थांबावे म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आवाहन करण्यात येत आहे. त्याचवेळी तुर्की व पाकिस्तानसारखे देश मात्र अझरबैजानला उघड सहाय्य करीत असल्याचे समोर येत आहे. तुर्कीने पहिल्याच दिवशी अझरबैजानला मोठ्या प्रमाणात लष्करी सहाय्य दिल्याचे तसेच सिरियन दहशतवाद्यांच्या तुकड्या पाठविल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ आता पाकिस्तानचाही सहभाग उघड झाला आहे.

आर्मेनियाच्या ‘न्यूज डॉट एएम’ या वेबसाईटने अझरबैजानी नागरिकांचे संभाषण प्रसिद्ध करून ‘नागोर्नो-कॅराबख’मधील अगदम शहरात पाकिस्तानी जवान लढत असल्याचा दावा केला. अगदमच्या जवळ त्यांनी पाकिस्तानी जवानांना एकत्र केले आहे आणि त्यांना घेऊन जात आहेत, असे एक अझरबैजानी नागरिक आपल्या सहकाऱ्याला फोनवरून सांगत असल्याचे आर्मेनियन वेबसाईटने म्हटले आहे. काही माध्यमांनी पाकिस्तान अझरबैजानमध्ये दहशतवादी पाठवित असल्याचा व गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ने पुढाकार घेतल्याचाही दावा केला आहे.

आर्मेनिया-अझरबैजान युद्धात पाकिस्तानी जवान अझरबैजानसाठी लढत असल्याचा दावाआर्मेनियन वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या या वृत्तानंतर, पाकिस्तान व अझरबैजान सहकार्याबाबत वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येत आहे. आर्मेनिया-अझरबैजान युद्धात पाकिस्तानने घेतलेला सहभाग तुर्कीबरोबरील जवळीक कायम राखण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे सांगण्यात येते. तुर्कीकडून काश्मीर मुद्यावर पाकिस्तानला समर्थन देण्यात येत असून, त्याची परतफेड करण्यासाठी पाकिस्तान तुर्कीच्या मोहिमांमध्ये सामील होत असल्याचे दावे करण्यात येत आहेत. त्याचवेळी सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर अझरबैजानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान आघाडीवर होता, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानने आर्मेनियाला मान्यता दिली नसल्याचीही जाणीव विश्लेषकांनी करुन दिली आहे.

leave a reply