बगदादपासून ते खोरासानपर्यंत शियापंथियांना यापुढेही लक्ष्य करण्याची आयएसची धमकी

काबुल – ‘बगदादपासून खोरासानपर्यंत शियापंथिय जिथे कुठे असतील, तिथे त्यांना लक्ष्य केले जाईल’, अशी खळबळ माजवणारी धमकी आयएस या दहशतवादी संघटनेने दिली. गेल्या दहा दिवसात आयएसने अफगाणिस्तानात शियापंथियांच्या दोन प्रार्थनास्थळांवर घडविलेल्या आत्मघाती स्फोटांमध्ये १६०हून अधिक जणांचा बळी गेला आहे. यानंतर अफगाणिस्तानातील आयएसच्या धोक्यावर रशिया व इराणने गंभीर चिंता व्यक्त केली होती. पण रशियाला वाटत असलेली चिंता निराधार असल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, आयएसने शियापंथियांना दिलेली धमकी अतिशय संवेदनशील बाब ठरते.

आयएसचा प्रचार करणार्‍या ‘अल-नबा’ या साप्ताहिकात शनिवारी आयएसची धमकी प्रसिद्ध करण्यात आली. शियापंथिय हे धोकादायक असल्याचे सांगून ते जिथे दिसतील तिथे, घरापासून ते सामुदायिक केंद्रांपर्यंत शियापंथियांना लक्ष्य केले जाईल, असे आयएसने धमकावले आहे.

अफगाणिस्तानातील शियापंथियांना उद्देशून आयएसने ही धमकी दिल्याचा दावा ‘खामा प्रेस’ या अफगाणी वृत्तसंस्थेने केला. कारण अफगाणिस्तानातील शियापंथिय आयएस-खोरासन विरोधात इराण व इतर देशांना सहाय्य करीत आहेत. म्हणूनच आयएसची ही धमकी फक्त अफगाणिस्तानातील शियापंथियांसाठी मर्यादित असल्याचे सदर वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे.

पण आपल्या पुढच्या धमकीत आयएसने बगदादपासून ते खोरासानपर्यंत शियापंथियांना लक्ष्य करण्याचे जाहीर केले. त्यामुळे आयएस अफगाणिस्तानसह इराक, इराण, पाकिस्तान तसेच मध्य आशियातील शियापंथियांनाही लक्ष्य करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणूनच आयएसच्या या धमकीचे गांभीर्य प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यापासून आयएसच्या दहशतवाद्यांनी तालिबानी दहशतवाद्यांवरील हल्ले वाढविले आहेत. पण गेल्या दहा दिवसात आयएसच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याचे केंद्र अफगाणिस्तानातील शियापंथिय ठरले आहेत. कुंदूझ व कंदहार येथील शियापंथियांच्या प्रार्थनास्थळांवर ऐन गर्दीच्या वेळी आयएसच्या दहशतवाद्यांनी घातपात घडविले होते.

तालिबानने अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित केल्यानंतर, या देशात जगभरातील दहशतवादी संघटना जम बसवतील, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी दिला होता. तर आयएस, अल कायदा व त्यांच्याशी संलग्न दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात आपला प्रभाव वाढवून शेजारी मध्य आशियाई देशांच्या सुरक्षेला आव्हान देतील, अशी चिंता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी व्यक्त केली होती. इराक व सिरियातील आयएसचे किमान दोन हजार दहशतवादी सध्या अफगाणिस्तानात असल्याची चिंता रशियन राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली होती.

पण तालिबानच्या दहशतवाद्याने स्थानिक अफगाणी वृत्तसंस्थेशी बोलताना रशियन राष्ट्राध्यक्षांची चिंता धुडकावली. अफगाणिस्तानात आयएसचा विशेष प्रभाव नाही. तसेच आयएसच्या दहशतवाद्यांना अफगाणी जनतेचे समर्थन नसल्याचा दावा तालिबानच्या या दहशतवाद्याने केला होता.

leave a reply