पाकिस्तानात लवकरच इस्लामी राजवट येईल

- पाकिस्तानातील तालिबानसमर्थक नेत्यांची घोषणा

इस्लामी राजवटइस्लामाबाद – पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये तालिबानचा झेंडा फडकावून व एके-४७ रायफल हातात घेऊन पाकिस्तानी पोलिसांना धमकावणारे नेता मौलाना अब्दुल अझिज यांनी पाकिस्तानच्या व्यवस्थेतला इशारा दिला. अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीचे सकारात्मक परिणाम पाकिस्तानातही होतील आणि लवकरच पाकिस्तानातही क्रांतीद्वारे इस्लामी राजवट आणली जाईल, असे मौलाना अब्दुल अझिज यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने मौलाना अझिज यांचा हा इशारा प्रसिद्ध केला. दरम्यान, पाकिस्तानच्या व्यवस्थेवर नाराज असलेले आणि तालिबानसमर्थक कट्टरपंथी गट देखील मौलाना अझिज यांना समर्थन देत आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानने अटक केलेल्या धार्मिक नेत्यांच्या सुटकेची मागणी जोर पकडत आहे.

मौलाना अझीझ यांनी २००७ साली इस्लामाबादमधील प्रार्थनास्थळाचा वापर करून पाकिस्तानच्या लष्कराविरोधात बंड पुकारले होते. आठवडाभर मौलाना अझिज यांचे सशस्त्र समर्थक आणि पाकिस्तानी लष्करात हा संघर्ष भडकला होता. पाकिस्तानचे तत्कालिन हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या अधिकारांचा वापर करुन प्रार्थनास्थळात लष्कर घुसविले होते, तसेच मौलाना अझिज यांना अटक केली होती.

त्याचे पडसाद पाकिस्तानच्या संरक्षणदलांमध्ये उमटले होते. पाकिस्तानच्या हवाईदलातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी मौलाना अझिज यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हुकूमशहा मुशर्रफ यांच्यावर हल्ला चढविला होता. मुशर्रफ यातून बचावले होते. यामुळे मौलाना अझिज यांचा पाकिस्तानी लष्करावरील प्रभाव अधोरेखित झाला होता.

याच मौलाना अझिज यांनी गेल्या काही दिवसांपासून तालिबानचे उघडपणे समर्थन आणि पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात मौलाना अझिज यांनी इस्लामाबादच्या प्रार्थनास्थळावर तालिबानचा झेंडा फडकावला. हा झेंडा उतरविण्यासाठी दाखल झालेल्या पोलिसांना मौलाना अझिज यांनी धमकावले. अफगाणी तालिबान तसेच पाकिस्तानी तालिबान तुमचाही बंदोबस्त करतील, अशी धमकी मौलाना अझिज याने यावेळी दिली होती.

इस्लामी राजवटअमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने मौलाना अझिज यांची नवी धमकी प्रसिद्ध केली. ‘अमेरिका आणि घमेंडखोर अमेरिकेचा तालिबानसमोर कसा पराभव झाला हे सार्‍या जगाने पाहिले आहे. अफगाणिस्तानच्या सत्तेवर तालिबानची राजवट असल्याचे सकारात्मक परिणाम इथे पाकिस्तानातही दिसतील. पाकिस्तानात इस्लामी राजवट प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना त्याचा नक्कीच फायदा मिळेल’, असे मौलाना अझिज म्हणाले.

दरम्यान, अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यामुळे पाकिस्तानातील कट्टरपंथियांना बळ मिळेल, असा इशारा पाकिस्तानातील काही सुजाण विश्‍लेषक व पत्रकार देत आहेत. या कट्टरपंथियांना वेळीच रोखले नाही तर पाकिस्तानातच गृहयुद्ध भडकण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. अफगाणिस्तान तालिबानच्या हाती गेल्यानंतर, पाकिस्तानातील हिंसाचार व दहशतवादी हल्ले यात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील तालिबानच्या यशाचे परिणाम लवकरच पाकिस्तानला भोगावे लागतील, हा विश्‍लेषकांनी दिलेला इशारा आता प्रत्यक्षात उतरू लागल्याचे दिसत आहे. मौलाना अझिज यांनी दिलेल्या धमकीमुळे ही बाब अधिक प्रकर्षाने समोर आली आहे.

leave a reply