इस्रायलचे सिरियन राजधानीवर सलग दुसऱ्या दिवशी हल्ले

दमास्कस – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सलग दुसऱ्या दिवशी सिरियाची राजधानी दमास्कसवर हवाई हल्ला चढविला. यामध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचा कमांडर ठार झाला. त्याचबरोबर सिरियातील इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणाला इस्रायलने लक्ष्य केल्याचा दावा केला जातो. यावर संतापलेल्या इराणने इस्रायलच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळणार असल्याचा इशारा दिला.

इस्रायलचे सिरियन राजधानीवर सलग दुसऱ्या दिवशी हल्लेशुक्रवारी पहाटे इस्रायलने राजधानी दमास्कसलगतच्या भागावर जोरदार हल्ले चढविले. इस्रायलचे हे हल्ले आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणेने यशस्वीरित्या भेदल्याचा दावा सिरियन लष्कराने केला. पण ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटना व आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात इराणच्या छुप्या तळाचे जबर नुकसान झाले. इस्रायलच्या या कारवाईत रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचा मिलाद हैदरी नावाचा कमांडर ठार झाल्याची कबुली इराणने दिली. सिरियातील इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने इतक्या घाईघाईने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली, याकडे इस्रायली वृत्तवाहिन्या लक्ष वेधत आहेत.

इराणने देखील इस्रायलच्या या हल्ल्याला नक्की प्रत्युत्तर मिळणार असल्याचे धमकावले. तसेच सार्वभौम सिरियातील इस्रायलच्या कारवायांवर आंतरराष्ट्रीय समुदायाने मूक राहण्याची भूमिका स्वीकारू नये, असेही इराणने बजावले. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासिर कनानी यांनी देखील गुरुवार व शुक्रवार सलग दोन दिवस सिरियात हल्ले चढविणाऱ्या इस्रायलच्या हल्ल्यांकडे आंतरराष्ट्रीय समुदाय दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. पण इराण इस्रायलच्या या हल्ल्यांविरोधात लवकरच ठाम भूमिका घेणार असल्याचे कनानी यांनी जाहीर केले.

गेल्या काही दिवसांपासून इस्रायलने सिरियातील हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. मार्च महिन्यात इस्रायलने सिरियात सहा हल्ले चढविले आहेत. यापैकी राजधानी दमास्कसमधील तीन हल्ल्यांचा समावेश आहे. तर सिरियातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दोन वेळा लक्ष्य केले होते. यामध्ये इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांची हानी झाल्याचा दावा मानवाधिकार संघटना व आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी केला होता. तर सिरियातील गृहयुद्ध आणि भूकंपाच्या आडून शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या इराणच्या प्रवासी विमानावर कारवाई करण्याचा इशारा इस्रायलने दिला होता.

इस्रायलचे सिरियन राजधानीवर सलग दुसऱ्या दिवशी हल्लेगेल्या वर्षी नफ्ताली बेनेट आणि येर लॅपिड यांच्या कार्यकाळात इस्रायलचे सिरियातील हल्ले कमी झाले होते, याकडे इस्रायली तसेच अरबी वृत्तसंस्था लक्ष वेधत आहेत. पण तीन महिन्यांपूर्वी इस्रायलची सूत्रे हाती घेतलेल्या पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सिरियातील इराणच्या ठिकाणांवरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली, असा दावा अरबी वृत्तसंस्था करीत आहेत. गेल्या महिन्यात इस्रायलच्या विमानांनी थेट सिरिया-इराकच्या सीमेपर्यंत धडक मारुन हल्ले चढविले होते. तर गेल्या काही आठवड्यांमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. गेल्याच महिन्यात दमास्कसच्या रस्त्यांवर झालेल्या हल्ल्यात रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे कर्नल दाऊद जाफरी हे ठार झाले होते.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून इस्रायलमध्ये पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्याविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. याचा फायदा घेऊन इराण इस्रायलवर छुपा हल्ला चढवू शकतो, असा इशारा इस्रायली विश्लेषक देत आहेत.

leave a reply