मुस्लिम ब्रदरहूड ट्युनिशियात अस्थैर्य निर्माण करील

- इटलीच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

रोम – ‘भूमध्य क्षेत्र कट्टरपंथियांच्या हवाली करणे अजिबात परवडणार नाही. त्यामुळे उत्तर आफ्रिकेतील ट्युनिशियाला आर्थिक सहाय्य पुरविणे अतिशय आवश्यक ठरते. अन्यथा ट्युनिशियातील आर्थिक संकटाचा फायदा घेऊन मुस्लिम ब्रदरहूड या देशात अस्थैर्य निर्माण करतील’, असा इशारा इटलीचे परराष्ट्रमंत्री अँटोनियो टयानी यांनी दिला. आर्थिक आघाडीवरील अपयशी ट्युनिशिया कुणाच्याही हिताचे नसेल, असे टयानी यांनी बजावले.

मुस्लिम ब्रदरहूड ट्युनिशियात अस्थैर्य निर्माण करील - इटलीच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशाराउत्तर आफ्रिकेतील ट्युनिशिया या देशासमोर गंभीर आर्थिक संकट उभे आहे. यातून बाहेर पडण्यासाठी ट्युनिशियाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे 1.9 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मागणी केली होती. पण ट्युनिशियाच्या सरकारने स्वीकारलेल्या आर्थिक धोरणांवर बोट ठेवून नाणेनिधीने या आफ्रिकी देशाला कर्ज नाकारले आहे. आधीच राजकीय अस्थैर्याचे लक्ष्य ठरलेल्या ट्युनिशियाची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. अशा परिस्थितीत ट्युनिशियाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी इटलीने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे आवाहन केले आहे.

2011 साली जस्मिन रिव्होल्युशनची सुरुवात ट्युनिशियातूनच झाली होती. सोशल मीडियावरील पोस्टनंतर पेटलेल्या जनआंदोलनाने येथील हुकूमशाही राजवट उलथली होती. त्यानंतर ट्युनिशियामध्ये निवडणूक घेऊन येथे पाश्चिमात्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे सरकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला. पण गेल्या अकरा वर्षांमध्ये ट्युनिशियामध्ये स्थिर सरकार स्थापन झालेले नाही. मुस्लिम ब्रदरहूड ट्युनिशियात अस्थैर्य निर्माण करील - इटलीच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारायाचा फायदा घेऊन मुस्लिम ब्रदरहूडसारखी दहशतवादी संघटना प्रबळ बनत चालली आहे. अरब देशांनी ‘टेरर लिस्ट’मध्ये सामील केलेल्या या संघटनेला रोखायचे असेल तर ट्युनिशियाला आर्थिक सहाय्य पुरवून या देशाची आर्थिक घडी बसवावी लागेल, असे इटलीचे परराष्ट्रमंत्री सुचवित आहेत.

दरम्यान, भूमध्य समुद्राच्या दक्षिणेकडील उत्तर आफ्रिकेमध्ये ट्युनिशियाचा समावेश आहे. तर या समुद्राच्या उत्तरेकडे इटली आहे. आफ्रिकेतील अराजक, अस्थैर्यामुळे लाखो निर्वासित ट्युनिशिया, लिबियाच्या किनारपट्टीवरुन सागरी मार्गाने इटली व शेजारी युरोपिय देशांमध्ये घुसखोरी करीत आहेत. या स्थलांतरीतांचे लोंढे रोखणे युरोपिय देशांसाठी आव्हान ठरू लागले आहे. अशा परिस्थितीत, या लोंढ्यांची गर्दी थोपविण्यासाठी ट्युनिशियाला आर्थिक बळ पुरविणे आवश्यक असल्याचे इटली अधोरेखित करीत आहे.

leave a reply