‘अंडरवॉटर गॅस पाईपलाईन’वर इस्रायल आणि इजिप्तची सहमती

जेरुसलेम – इस्रायलच्या ‘लेवियथान’ इंधनक्षेत्रातून इजिप्तमधील प्रकल्पांना नैसर्गिक इंधनवायुचा पुरवठा करणार्‍या ‘अंडरवॉटर गॅस पाईपलाईन’वर दोन्ही देशांचे एकमत झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील बैठक पार पडली. ही इंधनवाहिनी इस्रायल व युरोपिय देशांचा समावेश असणार्‍या ‘ईस्टमेड पाईपलाईन’चा विस्तारित टप्पा मानला जातो. या इंधनवाहिनीच्या निमित्ताने इजिप्तच्या इंधनमंत्र्यांनी इस्रायलला दिलेली भेट, ही गेल्या पाच वर्षात इजिप्तच्या वरिष्ठ मंत्र्यांनी इस्रायलला दिलेली पहिलीच भेट ठरली आहे.

Advertisement

‘अब्राहम करारामुळे या क्षेत्रात शांती व समृद्धीचे नवे युग सुरू झाले आहे. हा महत्त्वाचा दिवस त्या युगाचे प्रतीक ठरतो. इस्रायल व इजिप्तमधील ऐतिहासिक शांतीकरारानेच या सगळ्याची सुरुवात झाली आहे; आणि आता त्याचा फायदा या क्षेत्रातील सर्व जनतेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी होऊ शकतो’, या शब्दात इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इंधनवाहिनी प्रकल्पावर झालेल्या एकमताचे स्वागत केले. लेवियथान इंधनक्षेत्रात इस्रायल व इजिप्त या दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी तसेच त्यानंतर इतर देशांना निर्यात करण्यासाठी पुरेसा इंधनवायू उपलब्ध आहे, अशी ग्वाहीदेखील इस्रायली पंतप्रधानांनी दिली.

इजिप्तचे इंधनमंत्री तारेक अल मोल्ला यांनीही ‘अंडरवॉटर गॅस पाईपलाईन’च्या प्रस्तावावर समाधान व्यक्त केले. इंधनाच्या मुद्यावर इजिप्त व इस्रायलमध्ये सातत्याने चर्चा सुरू असून आम्ही सहकार्य अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे इजिप्तच्या इंधनमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी दोन देशांमधील चांगल्या संबंधांमुळेच ‘ईस्टमेड गॅस फोरम’सारखा उपक्रम सुरू झाला, याकडे लक्ष वेधले. इजिप्त नैसर्गिक इंधनवायू निर्यातीच्या क्षेत्रात प्रमुख केंद्र बनण्याचा प्रयत्न करीत असून, इस्रायलबरोबरील पाईपलाईन त्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

इस्रायलच्या किनारपट्टीपासून १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या लेवियथान इंधनक्षेत्राचा शोध २०१० साली लागला होता. या क्षेत्रात तब्बल २२ ट्रिलियन घनफूट इतक्या प्रचंड प्रमाणात इंधनवायू असल्याचे सांगण्यात येते. इस्रायलमध्ये लागलेल्या इंधनक्षेत्राच्या शोधात हे सर्वात मोठे व निर्णायक इंधनक्षेत्र ठरले आहे. या इंधनक्षेत्रातून इस्रायली जनतेला इंधनपुरवठा करण्याबरोबरच इजिप्त व जॉर्डन या दोन देशांना इंधनवायुची निर्यात केली जाते. मात्र त्यापलिकडे जाऊन युरोपिय देशांपर्यंत इंधनाची निर्यात वाढविण्यासाठी इस्रायल उत्सुक असून, इजिप्तबरोबर उभारण्यात येणारी ‘अंडरवॉटर गॅस पाईपलाईन’ त्याची सुरुवात ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या वर्षी ‘रेड सी’मार्गे भूमध्य समुद्राला जोडणार्‍या ‘एलियट अश्केलॉन’ या इंधन पाईपलाईनच्या वापरासंबंधी इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यात ऐतिहासिक करार पार पडला होता. त्यापूर्वी सायप्रस व ग्रीसच्या माध्यमातून युरोपला इंधनपुरवठा करणार्‍या ‘ईस्टमेड पाईपलाईन’साठीही इस्रायलने करार केला आहे.

leave a reply