देेशात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या पुन्हा दीड लाखांवर पोहोचली

नवी दिल्ली – देेशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. तसेच बर्‍या होणार्‍या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा दीड लाखांवर गेली आहे. महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांच्या तुलनेत सोमवारी कमी रुग्णांची नोंद झाली, मात्र पाच हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. देशात आढळत असलेले ८० टक्के नवे रुग्ण हे महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्येच आढळून येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक उच्चस्तरिय बैठकीत देशातील कोरोनासाथीच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

देशात रविवारपासून सोमवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात १४ हजार १९९ नवे रुग्ण आढळले, तर ९१२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. नवे रुग्ण आणि बर्‍या होणार्‍या रुग्णांमधील तफावत ४ हजार ४२१ इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली जात होती. त्यामुळे झपाट्याने अ‍ॅक्टीव्ह केस अर्थात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत होती. ही संख्या रोडावून सव्वा लाखापेक्षा खाली गेली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा हे आकडे उलटे फिरु लागले आहेत. सलग पाचव्या दिवशी बरे होणार्‍या रुग्णांपेक्षा कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या अधिक नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे १७ दिवसांनंतर पुन्हा एकदा देशातील कोरोनाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. तसेच नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ दिसून येत आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशभरात ८३ जण या साथीने दगावले आहेत. यामुळे आतापर्यंत या साथीत दगावलेल्याची संख्या १ लाख ५६ हजारांवर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा नव्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या साथीच्या संक्रमण वाढीला वेळीच आळा घालावा यासाठी विविध राज्य सरकारांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रात विदर्भात अनेक ठिकाणी अंशत: लॉकडाऊनची स्थिती आहेत. तर काही शहरात रात्रीची संचारबंदी आहे. तसेच महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाच्या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. मुंबईत पाच वॉर्डमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या आठवडाभरात ५० टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे नागरिकांना सर्व सुरक्षा उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

leave a reply