इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांविरोधातील कारवायांची तीव्रता वाढविली आहे

- इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांचा इशारा

जेरूसलेम – ‘येत्या काळात इराण आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटनांबरोबर संघर्षाची शक्यता बळावली आहे. अशा परिस्थितीत, इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला चढविण्यासाठी आवश्यक असलेली सज्जता आणि हालचाली इस्रायलने वाढविल्या आहेत’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अविव कोशावी यांनी दिला. इराणसंलग्न दहशतवादी संघटनांबरोबर क्षेत्रीय संघर्ष भडकलाच तर याआधी कधीही केली नव्हती, अशी जबरदस्त कारवाई इस्रायल करील, अशी घोषणा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी केली आहे.

इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांविरोधातील कारवायांची तीव्रता वाढविली आहे - इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांचा इशाराइस्रायली संसदेच्या फॉरिन अफेअर्स अँड डिफेन्स कमिटीसमोर बोलताना संरक्षणदलप्रमुख कोशावी यांनी इस्रायली लष्कराच्या तयारीची माहिती दिली. ‘इस्रायलच्या लष्कराने इराण आणि इराणच्या लष्करी आण्विक धोक्याविरोधातील नियोजन व तयारीची तीव्रता वाढविली आहे. गेल्या आठवड्यात संसदेने मंजूर केलेल्या इराणविषयक खर्चामुळे वेगवेगळ्या धोक्यांचा सामना करणे शक्य झाले आहे’, असे कोशावी म्हणाले. इस्रायलला अनेक आघाड्यांवर वेगवेगळ्या सुरक्षाविषयक आव्हानांना सामोरे जावे लागते, असे सांगून कोशावी यांनी या आव्हानांची माहिती दिली.

इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखण्याव्यतिरिक्त इस्रायलच्या सुरक्षेला आणखी दोन मोठे धोके असल्याची आठवण कोशावी यांनी करुन दिली. सर्वात पहिल्यांदा इस्रायलच्या सीमेला रॉकेट्स, क्षेपणास्त्रे, क्रूझ् क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सपासून धोका आहे. त्याचबरोबर इस्रायलच्या सीमेजवळ खोलवर भुयारीमार्ग खणून घुसखोरीच्या तयारीत असलेल्या लेबेनॉनमधील हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांपासूनही इस्रायलच्या सुरक्षेला धोका असल्याचे कोसावी म्हणाले.

इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांविरोधातील कारवायांची तीव्रता वाढविली आहे - इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांचा इशारागेल्या वर्षी इस्रायलचे संरक्षणदल शत्रूविरोधात आखातातील मोहिमांमध्ये आणि गोपनीय कारवायांमध्ये सामील झाल्याचा उल्लेख कोशावी यांनी केला. या वर्षीही इस्रायल आपल्या शत्रूविरोधातील कारवाईत गुंतलेला असल्याचे सांगून गाझापट्टीतील हमासविरोधी संघर्षाचा उल्लेख संरक्षणदलप्रमुखांनी केला. त्याचबरोबर यापुढेही इस्रायलचे लष्कर शत्रूविरोधात गोपनीय कारवाया करीत राहणार असल्याचे संकेत कोशावी यांनी दिले.

‘इस्रायल युद्ध टाळण्यासाठी काम करीत आहे. तरीही युद्ध भडकलेच तर याआधी कधीही केली नव्हती, अशी जबरदस्त कारवाई करण्यासाठी इस्रायल तयार असेल. अर्थात याआधी इस्रायलने कधीही दहशतवादाच्या मूळावर घाव घातला नव्हता, असा हादरवून टाकणारा हल्ला इस्रायल यावेळी चढविल’, असा सज्जड इशारा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी दिला. इराण हा दहशतवादाचा प्रायोजक असल्याचा आरोप इस्रायलने याआधी केला होता. त्यामुळे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट उल्लेख केला नसला तरी हिजबुल्लाह, हमास या इस्रायलविरोधी संघटनांना सहाय्य पुरविणार्‍या इराणवरच भीषण हल्ला चढविण्याचे संकेत संरक्षणमंत्री गांत्झ यांनी दिल्याचे दिसते आहे.

leave a reply