इस्रायल इराणला उत्तर देण्यासाठी सज्ज आहे

- इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांची घोषणा

तेल अविव – ‘इराण किंवा इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी इस्रायलवर हल्ला चढविला तर त्याला जोरदार उत्तर देण्याची तयारी इस्रायलने केली आहे. इस्रायलच्या शत्रूंना याची जबर किंमत चुकवावी लागेल’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अवीव कोशावी यांनी दिला. इस्रायलच्या गोपनीय दौर्‍यावर आलेल्या अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांच्या भेटीनंतर लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी सदर घोषणा केली.

‘गेल्या काही दिवसांपासून इराणकडून इस्रायलला धमक्या दिल्या जात आहेत. इराण तसेच सिरिया, हिजबुल्लाह आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना वेगवेगळ्या मार्गाने इस्रायलवर हल्ले चढविण्याच्या प्रयत्नात आहेत. या संघटनांनी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातून इस्रायल किंवा इस्रायलच्या हितसंबंधांवर हल्ला चढविलाच तर इराण व त्याच्या दहशतवादी संघटनांना तितकेच जोरदार प्रत्युत्तर मिळेल. या प्रत्युत्तराची सर्व तयारी आणि सज्जता झालेली आहे’, असे लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी अणुशास्त्रज्ञ फखरीझादेहच्या हत्येसाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तसेच या हत्येसाठी जबाबदार असणार्‍यांचा सूड घेण्याची धमकी राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी दिली होती.

leave a reply