भारताच्या पंतप्रधानांना अमेरिकेचा ‘लिजन ऑफ मेरिट’ सन्मान

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लिजन ऑफ मेरिट’ने सन्मानित केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे माजी पंतप्रधान अ‍ॅबे शिंजो यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांच्या हस्ते देण्यात आलेला हा पुरस्कार अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजित सिंग संधू यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वतीने स्वीकारला. या सन्मानाने आपण गौरवित झालो आहोत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.

‘लिजन ऑफ मेरिट’

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत आणि अमेरिकेचे धोरणात्मक सहकार्य नव्या उंचीवर पोहोचले आहे, यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी म्हटले आहे. ‘भारत व अमेरिकेमधील धोरणात्मक भागीदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश ठरते’, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी या सन्मानावर आभार व्यक्त केले आहेत. २१ वे शतक आपल्यासमोर अनेक नवी आव्हाने व संधी देखील घेऊन आले आहे. भारत-अमेरिका यांच्यातील सहकार्य दोन्ही देशांच्या जनतेमध्ये असलेल्या अफाट क्षमतेचा वापर करील व त्याचा सार्‍या मानवतेला लाभ मिळेल, असा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय आव्हानांवर मात करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या व संयुक्त सुरक्षेच्या संकल्पनेचा पुरस्कार करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटले आहे. तर इंडो-पॅसिफिक क्षेत्र मुक्त व खुले रहावे, करीता दाखविलेली दूरदर्शिता व नेतृत्त्व यासाठी जपानचे माजी पंतप्रधान अ‍ॅबे शिंजो यांना ‘लिजन ऑफ मेरिट’ने गौरवित करण्यात येत असल्याचे ओब्रायन यांनी स्पष्ट केले.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान व भारत यांनी एकत्र येऊन चीनच्या वर्चस्ववादी धोरणांच्या विरोधात क्वाडची स्थापना केली. हे संघटन इंडो-पॅसिफिक क्षेत्र मुक्त व खुले राहिल यासाठी प्रयत्न करणार असून या क्षेत्राची सुरक्षा सुनिश्‍चित करणार असल्याची ग्वाही दिली जाते. मात्र क्वाडची स्थापना आपल्याला रोखण्यासाठीच झालेली असल्याची चीनची भावना आहे. काही दिवसांपूर्वी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी देखील क्वाड म्हणजे चीनला रोखण्याचा प्रयत्न असून यात भारताने सहभागी होऊ नये, असा सूर लावला होता. पण लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ते हिंदी महासागर क्षेत्रापर्यंत चीन भारताच्या विरोधात चिथावणीखोर कारवाया करीत आहे. अशा परिस्थितीत क्वाडमध्ये सक्रिय होऊन चीनला प्रत्युत्तर देण्याखेरीज भारतासमोर पर्याय नसल्याची जाणीव भारताने रशियाला करून दिली होती.

या पार्श्‍वभूमीवर, क्वाडचे सदस्य असलेल्या भारत, ऑस्ट्रेलिया व जपानच्या नेत्यांना ‘लिजन ऑफ मेरिट’ सन्मान देऊन अमेरिकेने चीनसह सार्‍या जगाला संदेश दिल्याचे दिसत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत अमेरिकेची भूमिका स्पष्ट असून या क्षेत्रावर कुणा एका देशाचे वर्चस्व असू शकत नाही, असा दावा अमेरिकेने केला आहे. या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाने भूमिका पार पाडावी, असा आग्रह अमेरिकेने धरला होता. चीनची आक्रमकता वाढल्यानंतर, २०१७ सालापासून क्वाड अधिकच सक्रिय झाल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply