इराणविरोधात युद्धासाठी इस्रायलला सौदीची साथ हवी

- इस्रायली वर्तमानपत्राचा दावा

तेल अविव – इस्रायलचे पंतप्रधान नियुक्त बेंजामिन नेत्यान्याहू आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान थेट संपर्कात आहेत. उभय देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सौदीला अब्राहम करारात सामील करण्यासाठी नेत्यान्याहू इतर वादग्रस्त मुद्यांवर तडजोड करायलाही तयार झाले आहेत. कारण इस्रायल सध्या इराणविरोधी युद्धाची तयारी करीत असून यासाठी इस्रायलला सौदीची साथ हवी आहे, असा दावा इस्रायलमधील ‘येदियॉथ अहरोनॉथ’ या वर्तमानपत्राने केला. 4 जानेवारी रोजी बेंजामिन नेत्यान्याहू इस्रायलच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. सत्तेवर आल्यानंतर इतर अरब देशांप्रमाणे सौदी अरेबियालाही अब्राहम करारात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नेत्यान्याहू यांनी गेल्या काही दिवसांमधील आपल्या मुलाखतीतून स्पष्ट केले आहे. या प्रयत्नात आपल्याला यश मिळेल, असा दावा नेत्यान्याहू यांनी केला होता. इस्रायलमधील आघाडीच्या वर्तमानपत्राने याबाबत नवा दावा केला.

इस्रायलची सत्तासूत्रे हाती घेण्याआधीच नेत्यान्याहू यांनी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला आहे. सौदीबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी नेत्यान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशीही चर्चा सुरू केल्याचा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला. प्रिन्स सलमान देखील इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी उत्सूक आहेत. इराणविरोधातील या धोरणात्मक सहकार्यासाठी सौदीने इस्रायलसमोर तीन मागण्या ठेवल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे.

यामध्ये बायडेन प्रशासनाबरोबरचे संबंध, ‘एफ-35’ची खरेदी आणि जेरूसलेममधील प्रार्थनास्थळा संबंधीच्या मागण्यांचा समावेश आहे. गेल्या दीड वर्षात अमेरिकेतील बायडेन प्रशासन आणि सौदीमधील संबंधात मतभेद निर्माण झाले आहेत. खशोगी हत्याप्रकरण, मानवाधिकार तसेच इंधनाचे उत्पादन वाढविण्यास दिलेला नकार ही कारणे या मतभेदासाठी कारणीभूत ठरली आहे. नेत्यान्याहू यांनी हे संबंध सुधारण्यासाठी सहाय्य करावे, अशी मागणी सौदीने केली.

तर नेत्यान्याहू यांनी अमेरिकन काँग्रेसमधील आपला प्रभाव वापरुन सौदीला एफ-35 ही प्रगत लढाऊ विमाने मिळवून द्यावी. तसेच जेरूसलेममधील अल-अक्सा प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापनात सौदीला जागा करून द्यावी, या मागण्यांचा समावेश आहे. यापैकी अल-अक्सा प्रार्थनास्थळाबाबतच्या मागणीवरुन इस्रायल आणि जॉर्डनमधील संबंध बिघडू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येते. त्याचबरोबर इस्रायलच्या आगामी सरकार स्थापनेत जागा मिळालेल्या जहालमतवादी नेत्यांची समजूत काढण्याची मोठी जबाबदारी नेत्यान्याहू यांच्यावर येईल.

पण सौदीबरोबर सहकार्य वाढविण्यासाठी नेत्यान्याहू आपल्या सहकाऱ्यांची समजूत काढतील. काही काळासाठी सहकाऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करतील, असा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला. कारण इस्रायल इराणविरोधी युद्धाची तयारी करीत आहे व त्याआधी सौदीला आपल्या गटात सामील करुन घेणे आवश्यक असल्याचे नेत्यान्याहू यांना वाटत आहे, असे इस्रायली वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. इस्रायल आणि सौदीमध्ये छुपे सहकार्य होते, असा दावा याआधीही करण्यात आला होता. 2020 साली निऑम शहरामध्ये नेत्यान्याहू आणि प्रिन्स मोहम्मद यांच्यात छुपी भेट झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे लवकरच इस्रायल व सौदीमध्ये उघडपणे सहकार्य प्रस्थापित होईल, असे दावे फार आधीपासून करण्यात येत आहेत.

leave a reply