रशियातील ज्यूवंशिय स्थलांतरितांना स्वीकारण्यासाठी इस्रायलची तयारी सुरू

ज्यूवंशिय स्थलांतरितांनाजेरूसलेम – युक्रेन मोहिमेसाठी तीन लाख अतिरिक्त जवानांची तैनाती करण्याचा निर्णय रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी घेतला. याबरोबर गेल्या सहा महिन्यांपासून युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष तीव्र होण्याची शक्यता बळावली आहे. अशा परिस्थितीत, रशिया सोडणाऱ्या ज्यूवंशिय स्थलांतरितांना आश्रय देण्यासाठी इस्रायलने हालचाली सुरू केल्या आहेत. याआधीच रशिया व युक्रेनमधील हजारो ज्यूवंशिय इस्र्रायलमध्ये दाखल झाले होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच रशियाने अशा प्रकारे राखीव दलांमधील जवानांना तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेणारा ठरला होता. यासाठी रशियातील जवळपास अडीच कोटी नागरिकांना लष्करी भरतीच्या प्रक्रियेत सामील केले जाऊ शकते. 16 ते 58 वर्ष वयोगटातील रशियन नागरिकांवर सक्तीची भरती लादण्यात येणार आहे.

पण रशियन राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयाशी सहमत नसलेले हजारो जण रशियातून पलायन करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. यामध्ये ज्यूवंशियांचा मोठा समावेश असल्याचा दावा केला जातो. युरोपऐवजी हे ज्यूवंशिय इस्रायलला सर्वाधिक प्राधान्य देत असून इस्रायलने देखील तेल अविव ते रशियन राजधानी मॉस्कोला जाणाऱ्या विमानांची संख्या वाढविली आहे. तर रशियाच्या शेजारी देशांमधून इस्र्रायलमध्ये येणाऱ्या विमानांना देखील महत्त्व दिले जात आहे.

रशिया-युक्रेन युद्ध भडकल्यापासून किमान 23 हजार रशियन तर 13 हजार युक्रेनियन ज्यूवंशिय इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. पण राबी अलेक्झँडर बोरोदा यांच्यासारखे काही प्रसिद्ध ज्यूवंशिय अजूनही रशिया सोडायला तयार नसल्याचे लक्षात आणून दिले जात आहे.

leave a reply