अण्वस्त्रसज्जतेपासून इराणला रोखण्यासाठी इस्रायल आवश्यक ते सारे काही करेल

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

अण्वस्त्रसज्जतेपासूनन्यूयॉर्क – ‘इराणच्या राजवटीकडे अण्वस्त्रे आली तर नक्कीच त्याचा वापर केला जाईल. पण इस्रायलकडे लष्कर आहे आणि महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेसारखा मोठा मित्रदेश आहे. इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी आवश्यक ती लष्करी क्षमता इस्रायलकडे आहे. त्याचा वापर करताना इस्रायल अजिबात कचरणार नाही. इराण अण्वस्त्रांनी सज्ज होऊ नये, यासाठी इस्रायल आवश्यक ते सारे काही करेल’, असा सज्जड इशारा इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील भाषणात दिला.

अमेरिका आणि युरोपिय देश इराणबरोबर 2015 सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. बायडेन प्रशासन अणुकरारासाठी उत्सूक असल्याचा दावा केला जातो. पण सात वर्षांपूर्वीचा हा अणुकरार इराणला सहाय्यक असून अण्वस्त्रनिर्मितीच्या जवळ नेणारा असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. इराणबरोबरच्या अणुकरारातून पाश्चिमात्य देशांनी माघार घ्यावी, यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायलने राजनैतिक स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला संबोधित करताना देखील हाच प्रयत्न केला. ‘इस्रायल सध्या अण्वस्त्रसज्ज इराण आणि सत्याचा अभाव, अशा दोन धोक्यांचा सामना करीत आहे. इराण अण्वस्त्रसज्ज झालाच तर दहशतवादी देश आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटना देखील अण्वस्त्रांनी सज्ज होतील’, असा दावा इस्रायलचे पंतप्रधान लॅपिड यांनी केला. इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखायचे असेल तर लष्करी कारवाईचा इशारा देणे योग्य ठरेल, असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात स्पष्ट केले.

अण्वस्त्रसज्जतेपासून‘जर इराणने अण्वस्त्रसज्जतेच्या दिशेने पाऊल टाकले तर शब्दांनी नाही लष्करी कारवाईने उत्तर दिले जाईल, असा सुस्पष्ट संदेश आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणला देण्याची गरज आहे’, असे पंतप्रधान लॅपिड यांनी सुचविले. इराणपासून धोका निर्माण झालाच तर इस्रायल देखील लष्करी कारवाईचा वापर करील, असे लॅपिड यांनी जाहीर केले. पण इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत सारे जग सोप्या पर्यायांचा वापर करीत असल्याची जळजळीत टीका इस्रायलच्या पंतप्रधानांनी केली. थेट उल्लेख केला नसला तरी लॅपिड यांनी इराणच्या मागण्या मान्य करणाऱ्या बायडेन प्रशासन आणि युरोपिय महासंघाला लक्ष्य केल्याचा दावा इस्रायली विश्लेषक करीत आहेत.

तर सत्याचा अभाव या धोक्याचा उल्लेख करताना पंतप्रधान लॅपिड यांनी इस्रायलविरोधात केल्या जाणाऱ्या अपप्रचारांचा उल्लेख केला. यासाठी रशियातील तीन वर्षाच्या मुलीसोबत घडलेल्या घटनेचा दाखल दिला. सदर मुलगी पॅलेस्टिनी असल्याचे सांगून इस्रायली लढाऊ विमानांच्या कारवाईत ती ठार झाली, असा अपप्रचार करण्यात आला होता, याकडे इस्रायली पंतप्रधानांनी लक्ष वेधले. इस्रायलविरोधात खोटी माहिती देणारी अशी हजारो उदारहणे असल्याचा दावा लॅपिड यांनी केला. अशा इस्रायल द्वेषाने भरलेल्या बातम्या, व्हिडिओ, फोटोज्‌‍ सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्या जातात, असे इस्रायली पंतप्रधानांनी सांगितले.

दरम्यान, काही तासांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला संबोधित केले होते. यामध्ये बायडेन यांनी रशिया-युक्रेन युद्धाला अधिक महत्त्व दिले आणि इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका इस्रायली पत्रकार करीत आहेत. आपण इराणबरोबर अणुकरार करण्यावर ठाम असल्याचे संकेत बायडेन यांनी राष्ट्रसंघातील भाषणातून दिल्याचे या पत्रकारांचे म्हणणे आहे. तर इस्रायल देखील इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी आवश्यक ते सारे काही करायला तयार आहे, असा संदेश इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिला आहे.

leave a reply