इस्रायल बाहरिनला ड्रोन्स, ड्रोनभेदी यंत्रणा पुरविणार

- अमेरिकन वृत्तपत्राचा दावा

ड्रोनभेदी यंत्रणावॉशिंग्टन – इस्रायल आखाती देशांना हाताशी घेऊन इराणविरोधात मोठी आघाडी उभारीत असल्याचा दावा अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तपत्राने केला. इस्रायल बाहरिनला ड्रोन्स तसेच ड्रोनभेदी यंत्रणा पुरविणार आहे. यासाठी इस्रायलचे लष्करी अधिकारी बाहरिनला भेट देतील. त्यानंतर लवकरच बाहरिनच्या हवाईहद्दीत इस्रायली ड्रोन टेहळणी करताना दिसतील, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. दरम्यान, इस्रायल व अरब मित्रदेशांसाठी विशेष हवाई सुरक्षा यंत्रणा आवश्यक असल्याची घोषणा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती.

2020 साली इस्रायल आणि बाहरिन यांच्यात अब्राहम करार पार पडला. त्यानंतर उभय देशांनी परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. व्यापारी सहकार्याबरोबरच उभय देश संरक्षण सहकार्य वाढविणार असल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला होता. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी गेल्या आठवड्यात एका लष्करी कार्यक्रमात बोलताना अब्राहम करारात सहभागी असलेल्या देशांबरोबरच इतर अरब देशांसह संरक्षण सहकार्य वाढविण्याचे स्पष्ट केले होते. इराणच्या वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, आखाती देशांना हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविण्याचे संकेत गांत्झ यांनी दिले होते.

ड्रोनभेदी यंत्रणापण आत्ता ‘दी वॉल स्ट्रिट जर्नल’ या अमेरिकी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, इस्रायलने बाहरिनसह संरक्षण सहकार्य सुरू केले आहे. इस्रायल बाहरिनला ड्रोन्स तसेच ड्रोनभेदी यंत्रणा पुरविणार आहे. इस्रायल बाहरिनला फक्त सदर यंत्रणा पुरविण्यापर्यंत मर्यादित राहणार नसून इस्रायल बाहरिनच्या लष्करी अधिकाऱ्यांना त्याचे प्रशिक्षणही देणार आहे. यासाठी इस्रायली अधिकाऱ्यांचे पथक लवकरच बाहरिनला रवाना होणार असल्याची बातमी अमेरिकन वृत्तपत्राने दिली. इस्रायल व बाहरिनमधील हे सहकार्य इराणसाठी इशारा असल्याचा दावा सदर वृत्तपत्राने केला.

काही महिन्यांपूर्वी येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी सौदी अरेबिया आणि युएई या आखाती देशांच्या राजधानीवर स्फोटकांनी सज्ज असलेल्या ड्रोन्सचे हल्ले चढविले होते. यामध्ये सौदी व युएईचे भारी नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत, बाहरिनला ड्रोन व ड्रोन्सभेदी यंत्रणा पुरविणारा इस्रायल येत्या काळात सौदी व युएईला देखील सदर साहित्य पुरवू शकतो. असे झाले तर इस्रायल आणि अरब देशांची इराणविरोधात मोठी आघाडी तयार होईल, याकडे अमेरिकन वृत्तपत्राने लक्ष वेधले आहे.

दरम्यान, इस्रायल आणि अरब देशांची लष्करी आघाडी इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांसाठी उत्तर ठरू शकते, असे पाश्चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे. तर इस्रायल आणि अरब देशांची आघाडी आपले काहीच वाकडे करू शकत नाही, असा दावा इराणने काही दिवसांपूर्वीच केला होता.

leave a reply