चीनच्या लष्करी सामर्थ्याला हादरा देण्यासाठी अमेरिकेने तैवानसह इतर सहकारी देशांची संरक्षणक्षमता बळकट करायला हवी

- तैवानच्या माजी संरक्षणदलप्रमुखांचा सल्ला

अतैपेई/वॉशिंग्टन/बीजिंग – चीनकडून तैवानवर हल्ला होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. चीनने ‘ग्रे झोन वॉरफेअर’ची तीव्रता वाढविली असून त्याचे रुपांतर सर्वंकष आक्रमणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे रोखण्यासाठी चीनच्या राजवटीत आक्रमणाच्या परिणामांबाबत अनिश्‍चितता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी अमेरिकेने तैवानबरोबरच इतर सहकारी देशांच्या संरक्षणक्षमता बळकट करून चीनच्या लष्करी सामर्थ्याला हादरे द्यायला हवेत, असा सल्ला तैवानचे माजी संरक्षणदलप्रमुख ‘ली सी-मिन’ यांनी दिला आहे.

चीनच्या लष्करी सामर्थ्याला हादरा देण्यासाठी अमेरिकेने तैवानसह इतर सहकारी देशांची संरक्षणक्षमता बळकट करायला हवी - तैवानच्या माजी संरक्षणदलप्रमुखांचा सल्लाकाही दिवसांपूर्वीच कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा व चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरून आक्रमक शब्दात इशारा दिला होता. ‘तैवानच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेले कोणत्याही प्रकारचे प्रयत्न ठाम निर्धारासह कारवाई करून हाणून पाडले जातील. सार्वभौमत्त्व व एकजूट कायम राखण्यासाठी चिनी जनतेकडे असलेली क्षमता व इच्छा याकडे दुर्लक्ष करण्याची चूक कोणीही करु नये’, असा इशारा देऊन तैवानचा मुद्दा चीनची कम्युनिस्ट राजवट कधीही सोडणार नाही, असे जिनपिंग यांनी बजावले होते.

जिनपिंग यांच्या या इशार्‍यापूर्वी, चीनने तैवानच्या सामुद्रधुनीसह ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रात तब्बल दीडशे ‘स्टेल्थ’ लढाऊ विमाने तैनात केल्याचे समोर आले होते. चीनच्या संरक्षणदलांनी तैवानच्या क्षेत्रातील हालचाली वाढविल्या असून युद्धनौका, पाणबुड्या तसेच लढाऊ विमानांकडून सातत्याने धडका मारणे सुरू आहे. गेल्याच महिन्यात चीनने तैवानवरील आक्रमणाची रंगीत तालीम म्हणून ‘साऊथ चायना सी’मध्ये युद्धसराव केल्याचेही समोर आले होते.

या सर्व पार्श्‍वभूमीवर तैवानच्या माजी संरक्षणदलप्रमुखांनी दिलेला सल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो. ‘ली सी-मिन’ यांनी अमेरिकेच्या ‘एनबीसी न्यूज’ या वेबसाईवर लिहिलेल्या लेखात, चीन तैवानवर आक्रमण करण्याची वाट पाहत बसू नये असे बजावले आहे. त्याऐवजी तैवानविरोधातील संघर्षासाठी चीन विकसित करीत असलेल्या लष्करी सामर्थ्याला हादरे देणे हा आक्रमण रोखण्याचा सर्वोत्तम पर्याय ठरेल, असे म्हटले आहे. त्यासाठी अमेरिकेने तैवानच्या संरक्षणक्षमता बळकट करणे महत्त्वाचे असून, इस्रायलप्रमाणे ‘वॉर रिझर्व्ह स्टॉक्स फॉर अलाईज्’च्या धर्तीवर योजना आखायला हवी, असे आवाहन तैवानच्या माजी संरक्षणदलप्रमुखांनी केले आहे. तैवानला सातत्याने सज्ज राखणे ही अमेरिकेची जबाबदारी असल्याची जाणीवही ‘ली सी-मिन’ यांनी करून दिली आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राजनैतिक पातळीवर तसेच संरक्षणक्षेत्रात तैवानला मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याचे धोरण राबविले होते. अमेरिकेच्या या धोरणात, इंडो-पॅसिफिकमधील इतर प्रमुख देशांनीही तैवानबरोबरील सहकार्य वाढविण्याच्या मुद्याचा समावेश होता. अमेरिकेने मित्रदेशांसह या भागातील लष्करी वावर वाढवित चीनला स्पष्ट इशाराही दिला आहे. मात्र हे पुरेसे नसून अमेरिकेच्या नव्या प्रशासनाने अधिक आक्रमक धोरण राबवून चीनला रोखण्याची गरज असल्याचे संकेत तैवानच्या माजी अधिकार्‍यांनी लिहिलेल्या लेखातून मिळत आहेत.

leave a reply