युक्रेनचा वापर करून अमेरिका रशियाला आव्हान देत असताना रशियाने लॅटिन अमेरिकेतील हालचाली वाढविल्या

मॉस्को/कॅराकस – युक्रेनमध्ये अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांकडून सुरू असलेल्या हस्तक्षेपाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने लॅटिन अमेरिकी देशांशी जवळीक वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. लॅटिन अमेरिकेतील आघाडीचा देश असणार्‍या ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनेरो सध्या रशियाच्या दौर्‍यावर आहेत. तर रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह व्हेनेझुएलासह क्युबा व निकारागुआ दौर्‍यासाठी लॅटिन अमेरिकेत दाखल झाले आहेत. गेल्याच महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी क्युबा, व्हेनेझुएला व निकारागुआ या तिन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली होती.

ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनेरो यांच्यासह ब्राझिलचे संरक्षण तसेच परराष्ट्रमंत्री रशिया दौर्‍यावर उपस्थित आहेत. बोल्सोनेरो यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. या चर्चेनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले असून ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी शांततेच्या मुद्यावर ब्राझिलचे रशियाला समर्थन असल्याचे म्हटले आहे. दोन देशांमधील चर्चेत अणुऊर्जा व लष्करी सहकार्यावरही बोलणी झाली असून ब्राझिलने रशियाकडे ‘स्मॉल मोड्युलर न्यूक्लिअर रिऍक्टर्स’ची मागणी केल्याचे सांगण्यात येते.

युक्रेन मुद्यावरून तणावाची स्थिती असतानाच ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाला दिलेली भेट अमेरिकेच्या चिंता वाढविणारी ठरली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने यावरून ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात नाराजीही व्यक्त केली. राष्ट्राध्यक्ष बोल्सोनेरो यांनी रशियाला समर्थन देणारे निवेदन देणे चुकीचे ठरते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. रशिया भेटीनंतर ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष हंगेरीला रवाना झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह सध्या लॅटिन अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. बुधवारी त्यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांची भेट घेतली. या भेटीनंतर मदुरो यांनी रशियाबरोबर लष्करी सहकार्य वाढविण्यास व्हेनेझुएला तयार असल्याची ग्वाही दिली आहे. दोन देशांमध्ये धोरणात्मक तसेच सामरिक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहितीही रशियन सूत्रांनी दिली आहे. व्हेनेझुएलानंतर रशियाचे शिष्टमंडळ क्युबा व निकारागुआला भेट देणार आहेत.

गेल्या काही वर्षात अमेरिका व नाटोने रशियानजिकच्या देशांमधील वावर तसेच सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. एकेकाळी रशियन संघराज्याचा भाग असलेल्या अनेक देशांना नाटोचे सदस्यत्व देण्यात आले आहे. यामुळे रशियात तीव्र नाराजीची भावना आहे. पाश्‍चात्यांकडून आपल्या सीमेनजिक सुरू असणार्‍या हालचालींनी रशिया अस्वस्थ आहे.

याच्या प्रत्युत्तरादाखल रशियाने अमेरिकेचे अंगण म्हणून ओळखण्यात येणार्‍या लॅटिन अमेरिकन देशांमधील आपल्या हालचाली वाढविण्यास सुरुवात केली आहे. क्युबा व व्हेनेझुएला या दोन्ही देशांशी रशियाचे जुने संबंध आहेत. हे सहकार्य अधिकच भक्कम करण्यासाठी रशिया हालचाली करीत असल्याचे दिसत आहे. अमेरिका युक्रेनचा वापर करणार असेल तर रशियाकडेही लॅटिन अमेरिकन देशांचा अमेरिकेच्या विरोधात वापर करण्याचा पर्याय आहे, याची जाणीव रशिया करून देत आहे.

leave a reply