इस्रायलने पॅलेस्टाईनचा मुद्दा सोडविण्यासाठी पावले उचलावी

- सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचे आवाहन

पॅलेस्टाईनचा मुद्दारियाध/डावोस – युएई, बाहरिन आणि मोरोक्को प्रमाणे सौदी अरेबियाला देखील अब्राहम कराराच्या रिंगणात सामील करून घेण्याची इस्रायलची इच्छा असल्याचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी जाहीर केले. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत इस्रायलच्या पंतप्रधानांनी अब्राहम करार व सौदीचा त्यातील समावेश यावर चर्चा केली. पण इस्रायलने चर्चेद्वारे पॅलेस्टाईनचा मुद्दा सोडविण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी केले. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी नुकताच इस्रायलचा दौरा केला. इस्रायलच्या सत्तेवर बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार आल्यापासून अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इस्रायलला भेट देण्याची ही पहिलीच वेळ ठरते. यानिमित्ताने इस्रायलसह अब्राहम करारात सहभागी असलेल्या युएई, बाहरिन व मोरोक्कोच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांबरोबर सुलिवन यांनी व्हर्च्युअल बैठक घेतली. तर इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्याबरोबर झालेल्या भेटीत सुलिवन यांनी पॅलेस्टाईनच्या निर्मितीचा मुद्दा उपस्थित केला.

पॅलेस्टाईनचा मुद्दाइस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा, इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचा आखातातील वाढता प्रभाव तसेच सौदीला अब्राहम करारात सामील करून घेण्याच्या मुद्यांना महत्त्व दिले. अब्राहम कराराचे वर्तुळ वाढविण्याची आवश्यकता असून यामध्ये सौदी अरेबियाला सामील करण्याबाबत सुलिवन यांच्याशी चर्चा झाल्याचे नेत्यान्याहू यांनी स्पष्ट केले. पण गेल्या दोन वर्षांपासून अमेरिका व सौदी यांच्यातील तणाव दूर झाल्याशिवाय हे शक्य नसल्याचे इस्रायलने याआधीच स्पष्ट केले होते.

जेरूसलेममध्ये इस्रायलचे पंतप्रधान व अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यात ही चर्चा सुरू असताना स्वित्झर्लंडच्या डावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांना अब्राहम करारातील सहभागावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायलकडून असलेली अपेक्षा व्यक्त केली. पॅलेस्टाईनचा मुद्दा सोडविण्यासाठी इस्रायलने गंभीरपणे प्रयत्न करावे. दोन्ही देशांमधील चर्चेतूनच हा मुद्दा निकाली लागेल, असा विश्वास प्रिन्स फैझल यांनी व्यक्त केला. पण इस्रायलचे सरकार हा मुद्दा सोडविण्यासाठी तितकेसे उत्साही दिसत नसल्याचा दावा सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी काही महिन्यांपूर्वीच इस्रायलबरोबरच्या अब्राहम करारात सामील होण्याची तयारी व्यक्त केली होती. पण त्यावेळीही प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पॅलेस्टाईनचा मुद्दा उपस्थित केला होता. इस्रायलच्या तेव्हाच्या सरकारने पॅलेस्टाईनबाबत चर्चा तसेच सौदीला अब्राहम करारात सामील करून घेण्याचा मुद्दा अलिप्त ठेवला होता.

दरम्यान, 2014 सालापासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील शांतीचर्चा रखडली आहे. वेस्ट बँकमधील काही भागात इस्रायलने निर्वासितांसाठी वस्त्यांचे बांधकाम सुरू केल्यामुळे सदर चर्चा रखडल्याचा दावा केला जातो. इस्रायल-पॅलेस्टाईनमधील ही चर्चा सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले होते. पण दोन्ही नेत्यांमधील मतभेदांमुळे सदर चर्चा पुढे सरकू शकलेली नाही.

leave a reply