इस्रायलने पॅलेस्टिनी शहर नकाशातून पुसून टाकावे

- इस्रायलच्या मंत्र्यांची वादग्रस्त मागणी

पॅलेस्टिनी शहरजेरूसलेम/वॉशिंग्टन – इस्रायली नागरिकांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरलेले पॅलेस्टिनी शहर हवारा नकाशातूनच पुसून टाकावे, अशी खळबळ माजविणारी मागणी इस्रायलचे अर्थमंत्री व जहाल नेते बेझलेल स्मोरिच यांनी केली. इस्रायली सरकारमधील सहकारी व इतर समविचारी नेत्यांकडून स्मोरिच यांच्या विधानांचे जोरदार समर्थन केले जात आहे. पण अमेरिका, इजिप्त या देशांनी स्मोरिच यांच्यावर ताशेरे ओढले. अमेरिकेने स्मोरिच यांची व्हाईट हाऊस भेट रद्द करून आपली नाराजी प्रदर्शित केली आहे.

रविवारी सकाळी पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमधील नेब्लस शहरात हवाराच्या रस्त्यावर अज्ञात हल्लेखोराने दोन ज्यूधर्मिय भावांना गोळ्या झाडून ठार केले. ज्यूधर्मियांच्या या हत्येचे वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी कट्टरपंथियांनी स्वागत केले. तर काही ठिकाणी याचा आनंद साजरा करण्यात आला. गेल्या काही महिन्यांमध्ये ज्यूधर्मियांवरील हल्ल्यांनंतर वेस्ट बँकमध्ये फटाके फोडून तसेच मिठाई वाटून आनंद साजरा केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पण इस्रायलमधून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटली. इस्रायली निर्वासितांच्या गटाने नेब्लस शहरात घुसून पॅलेस्टिनी कट्टरपंथियांच्या वाहनांची जाळपोळ केली.

इस्रायलने नेब्लस तसेच हवारा शहरात अतिरिक्त सैन्यतैनाती करुन अप्रिय घटना घडणार नाहीत, याची काळजी घेतली आहे. मात्र ज्यूधर्मियांच्या हत्येसाठी जबाबदार असलेले हवारा हे शहरच नकाशातून पुसून टाकण्याची मागणी इस्रायलचे अर्थमंत्री तसेच संरक्षण मंत्रालयात वेस्ट बँकचे सुरक्षाप्रमुख असलेले बेझलेल स्मोरिच यांनी केली. वेस्ट बँकमधील हवारा शहरात सात हजार पॅलेस्टिनींचे वास्तव्य आहे. त्यामुळे या शहराला नकाशातून पुसून टाकण्याची मागणी करणारे स्मोरिच येथील सात हजार पॅलेस्टिनींना बेघर करण्याचे संकेत देत असल्याचे पाश्चिमात्य विश्लेषकांचे म्हणणे आहे.

स्मोरिच यांच्या या विधानांचे सरकारमधील सहकारी नेत्यांनी तसेच इतर राजकीय पक्ष तसेच संघटनेच्या नेत्यांनी जोरदार स्वागत केले. ज्यूधर्मियांची हत्या करणाऱ्यांवर इस्रायलचे लष्कर कारवाई करणार नसेल तर हवारा शहर पेटवून दिले जावे, अशी मागणी स्थानिक नेत्याने केली. इस्रायली लष्कराने हल्लेखोरांविरोधात कारवाई केली असती तर इस्रायली नागरिकांना कारवाई करावी लागलीच नसती, असे सांगून नेब्लस शहरात इस्रायली निर्वासितांनी पॅलेस्टिनींची वाहने, इमारतीविरोधात केलेल्या हिंसाचाराचे या नेत्याने समर्थन केले.

इस्रायलच्या नेत्यान्याहू सरकारमधील जहाल व कडवे पॅलेस्टाईनविरोधी नेते म्हणून स्मोरिच यांची ओळख आहे. याआधी सत्तेत नसताना स्मोरिच यांनी पॅलेस्टाईनविरोधी विधाने केली होती. पण आत्ता इस्रायलचे मंत्री असलेल्या स्मोरिच यांची विधाने अधिक गांभीर्याने घेणे भाग आहे, असे पाश्चिमात्य विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यांच्या या विधानांवर अमेरिका तसेच इतर देश सडकून टीका करीत आहेत.

स्मोरिच यांचे जहाल विधान हिंसाचाराला आमंत्रण देणारे ठरू शकते. तसेच सदर विधाने बेजबाबदार, घृणास्पद आणि किळसवाणी असल्याचे ताशेरे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी ओढले. त्याचबरोबर इस्रायलच्या अर्थमंत्र्यांनी अमेरिकेचा दौरा केला तरी त्यांना व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

दरम्यान, इजिप्त आणि मानवाधिकार संघटनेने देखील स्मोरिच यांची विधाने इस्रायल व पॅलेस्टाईनमधील शांतीचर्चा धोक्यात टाकणारी असल्याची टीका केली.

leave a reply