इस्रायल, अरबांमधील सहकार्याने शांती प्रस्थापित होणार नाही

-पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास

रामल्ला – ‘आभासी शांततेने खरी शांती मिळत नाही. त्याचप्रमाणे पॅलेस्टिनींना वगळून अरब देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित केल्याने या क्षेत्रात शांती प्रस्थापित होणार नाही’, अशा इशारा पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी दिला. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत अब्बास यांनी इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) सहकार्यावर जोरदार ताशेरे ओढले. दरम्यान, युएई प्रमाणे इतर अरब देशांनी देखील इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित करावे, यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आखाती देशांच्या दौर्‍यावर दाखल झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर अब्बास यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

शांती प्रस्थापित

इस्रायल आणि युएई यांच्यातील ऐतिहासिक सहकार्यानंतर इस्रायल-पॅलेस्टाईनमधील शांतीचर्चेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आंतरराष्ट्रीय घडामोडींनी वेग धरला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या विशेष सत्रात पॅलेस्टाईनचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. ब्रिटन, जर्मनी, रशिया या देशांनी स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मुद्याचे या बैठकीत समर्थन केले. नेमक्या ह्याचवेळी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री राब यांनी वेस्ट बँकमधील पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेऊन द्विराष्ट्रीय योजनेला ब्रिटनचा पाठिंबा असल्याचे सांगितले. यावेळी अब्बास यांनी पुन्हा एकदा इस्रायल आणि युएईतील सहकार्यावर जोरदार टीका केली.

पॅलेस्टाईनच्या भूभागावरील इस्रायलचे नियंत्रण संपुष्टात आणून १९६७ सालच्या सीमारेषेच्या आधारावर सार्वभौम पॅलेस्टाईनची निर्मिती झाल्याखेरीज तसेच पॅलेस्टिनी जनतेला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय या क्षेत्रात शांती, सुरक्षा व स्थैर्य प्रस्थापित होऊ शकत नाही’, अशी घोषणा अब्बास यांनी राब यांच्याबरोबरील भेटीदरम्यान केली. तर, ‘इस्रायल अजूनही वेस्ट बँकमध्ये वस्त्यांचे बांधकाम करीत असून इस्रायलने वेस्ट बँकचे तुकडे करण्याची योजना रद्द केलेली नाही. इस्रायलच्या या कारवाया कुठलीही शांतीचर्चा फिस्कटवू शकतात’, अशी नाराजी अब्बास यांनी व्यक्त केली. पॅलेस्टिनींना डावलून अरब देशांशी सहकार्य केल्यास शांती प्रस्थापित होऊ शकत नाही, असा दावा राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी केला. त्याचबरोबर २००२ साली अरब देशांनी दिलेल्या प्रस्तावामुळेच या क्षेत्रात शांती प्रस्थापित होईल, असेही अब्बास यावेळी म्हणाले.

पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी यावेळी इस्रायलबरोबरच्या शांतीचर्चेसाठी तयार असल्याचेही स्पष्ट केले. पण अमेरिका, रशिया, युरोपिय महासंघ आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्याबरोबर इतर काही देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही चर्चा पार पडावी, असा प्रस्ताव अब्बास यांनी दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वर्षांपूर्वी प्रस्तावित इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील चर्चेला अब्बास यांनी सदर प्रस्तावाबरोबर बगल दिल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यातही अब्बास यांनी इस्रायल आणि युएईमध्ये झालेल्या शांतीकरारावर टीका केली होती. या करारासह युएई’ने पॅलेस्टिनींचा विश्वासघात केला असून यापुढे शांतीचर्चेला अर्थ उरला नसल्याचे अब्बास म्हणाले होते.

दरम्यान, पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष अब्बास इस्रायल व युएईतील सहकार्यावर टीका करीत असताना, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ बुधवारी बहारिनमध्ये दाखल झाले. इस्रायल व इतर अरब देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आखाती देशांच्या विशेष दौर्‍यावर दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बहारिनने इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते.

leave a reply