हमासबरोबरच्या सहकार्यासाठी तुर्कीवर बहिष्कार टाकले जातील

- अमेरिकेचा तुर्कीला इशारा

वॉशिंग्टन – तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन आणि हमासच्या नेत्यांमध्ये झालेल्या भेटीवर अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे. एर्दोगन यांच्या राजवटीने हमासबरोबर प्रस्थापित केलेले सदर सहकार्य तुर्कीला आंतरराष्ट्रीय समुदायातून बहिष्कृत करू शकते, असा सज्जड इशारा अमेरिकेने दिला. तुर्कीने यावर प्रतिक्रिया दिली असून अमेरिकेने इस्रायलचे हितसंबंध जपणे सोडून द्यावे, असा पलटवार तुर्कीने केला आहे.

तुर्कीवर बहिष्कार

इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यात झालेल्या ऐतिहासिक शांतीकराराला प्रत्युत्तर म्हणून तुर्कीने गाझापट्टीतील हमास व संलग्न दहशतवादी संघटनेच्या नेत्यांची बैठक बोलाविली होती. शनिवारी तुर्कीमध्ये पार पडलेल्या या बैठकीत हमासचा प्रमुख इस्माईल हनिया आणि दुसर्‍या क्रमांकाचा नेता सालेह अल-अरुरी तसेच हमासच्या इतर नेत्यांची हजेरी होती. यावेळी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी हनियासह हमासच्या नेत्यांची भेट घेऊन स्वतंत्र चर्चा केली. यावेळी हमासने गाझापट्टीत सुरू केलेल्या इस्रायलविरोधी मोहीमेला तुर्कीने आपले समर्थन जाहीर केले. त्याचबरोबर हमासच्या १२ जणांना तुर्कीचे नागरिकत्व तसेच नवा पासपोर्ट जारी केला.

दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या हमासबरोबर तुर्कीने प्रस्थापित केलेल्या या सहकार्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जोरदार टीका केली. ‘दहशतवादी संघटनेबरोबरचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे सहकार्य तुर्कीला आंतरराष्ट्रीय बहिष्काराच्या जवळ नेत आहेत. या सहकार्यामुळे पॅलेस्टिनी जनतेचे हितसंबंध धोक्यात सापडू शकतात आणि गाझापट्टीतून इस्रायलवर होणारे हल्लेही वाढू शकतात’, अशी टीका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. याआधीही अमेरिकेने तुर्कीला हमासबरोबरच्या सहकार्यासाठी झापले होते, याची आठवण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने करुन दिली. फेब्रुवारी महिन्यात एर्दोगन यांनी हमासच्या दहशतवाद्यांची पहिली अधिकृत भेट घेतली होती. त्यामुळे वारंवार इशारे देऊनही तुर्की ऐकणार नसेल तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट संकेत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत.

अमेरिकेच्या या इशार्‍याला तुर्कीने प्रत्युत्तर दिले असून हमासबरोबरच्या सहकार्याला नावे ठेवणार्‍या देशांनी सर्वात आधी इस्रायल-पॅलेस्टाईनचा वाद सोडविण्याला प्राधान्य द्यावे, असा टोला तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगावला आहे. त्याचबरोबर गाझातील जनतेने हमासला सत्तेवर निवडून दिल्याचे सांगून तुर्कीने हमासबरोबरच्या सहकार्याचे समर्थन केले. गेल्या १२ दिवसांपासून गाझापट्टीतून हमास व इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांचे इस्रायलच्या सीमाभागातील हल्ले सुरू असून इस्रायलने त्याला प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि तुर्कीतील संबंधात तणाव वाढत चालला आहे. सिरिया तसेच लिबियातील संघर्षाप्रश्‍नी आणि रशियाबरोबरच्या एस-४०० च्या खरेदीवरुन अमेरिका व तुर्कीमध्ये मतभेद वाढले आहेत. हमासबरोबरच्या सहकार्याने या तणावात भर पडली आहे.

leave a reply