आंतरराष्ट्रीय समुदायाने पाठ फिरविली तर इस्रायल इराणवर लष्करी कारवाई करील

- इस्रायलचा खणखणीत इशारा

लष्करी कारवाईतेल अविव – इराणमधील खामेनी यांच्या राजवटीने इस्रायल नष्ट करण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. मात्र इराणची तलवार आमच्या मानेवर येईपर्यंत आम्ही वाट पाहू शकत नाही. ती वेळ येण्याच्या आधीच आवश्यक तो संघर्ष छेडताना इस्रायल अजिबात कचरणार नाही, असे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी बजावले आहे. तर इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख ताशी हानेबी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलकडे पाठ फिरवलीच, तर पंतप्रधान नेत्यान्याहू इराणवर हल्ल्याचे आदेश देतील, असे हानेबी यांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लेबेनॉनचा दौरा करुन हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाची भेट घेतली होती. त्यानंतर सिरियातील आपल्या दौऱ्यात इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायलशी सहकार्य करणाऱ्या अरब देशांना बजावले होते. इस्रायलशी संबंध सुधारून पॅलेस्टाईनच्या निर्मितीचा मुद्दा सुटणार नसल्याचे सांगून इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायलचे अस्तित्व नाकारले होते. याआधीही इराणच्या नेत्यांनी इस्रायलचे अस्तित्व नाकारुन, या जगाच्या नकाशावरुन इस्रायलला पुसून टाकण्याची धमकी दिली होती. पण आधीप्रमाणे अमेरिका व युरोपिय देशांनी इराणच्या नव्या धमकीवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

अशा परिस्थितीत, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी तेल अविव येथील इस्रायली संरक्षणदलप्रमुखांच्या मुख्यालयातून इराणसह पाश्चिमात्य देशांना खडसावले. ‘इस्रायलला निरर्थक युद्धात स्वतःला अडकवून घ्यायचे नाही. पण इस्रायलचे सरकार देशाच्या सुरक्षेसाठी असलेला धोका ओळखून आपल्या लष्कराला या धोक्यावर थेट कारवाई करण्याचे आदेश देईल. इराणची राजवट इस्रायलला नष्ट करण्याच्या धमक्या देत आहे आणि इराणची ही तलवार मानेवर घाव करेपर्यंत इस्रायल वाट पाहणार नाही. इस्रायली लष्कर, शिन बेत सुरक्षा यंत्रणा आणि मोसाद एकत्र येऊन आपल्या शत्रूला जबरदस्त प्रत्युत्तर देईल’, असे नेत्यान्याहू म्हणाले.

आखातातील 90 टक्के समस्यांसाठी इराणच जबाबदार असल्याचा ठपका इस्रायलच्या पंतप्रधानांनी ठेवला. आखाती देशांमधील दहशतवादासाठी इराण कारणीभूत असल्याची आठवण नेत्यान्याहू यांनी करुन दिली. इस्रायली पंतप्रधानांनी इराणला दिलेल्या या इशाऱ्याच्या काही तास आधी इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख ताशी हानेबी यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना आंतरराष्ट्रीय समुदायाला, विशेषत: इराणशी वाटाघाटी करणाऱ्या बायडेन प्रशासनाला संदेश दिला.

‘इराणवरील लष्करी कारवाई टाळण्यासाठी इराणची राजवट अण्वस्त्रांनी सज्ज झालेली खपवून घ्यायचे असेल, तर इस्रायलचा कुठलाही नेता ते अजिबात स्वीकारणार नाही. इराण अण्वस्त्रांनी सज्ज होऊ नये, हे इस्रायलच्या पंतप्रधानांचे उद्दिष्ट आणि त्यांचे मुख्य कर्तव्य आहे. पण आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणचा अणुकार्यक्रम रोखण्याची जबाबदारी पार न पाडता इस्रायलकडे पाठ फिरवली तर आमचे पंतप्रधान नेत्यान्याहू इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढवतील. त्यांनी तसे आदेश इस्रायली लष्कराला दिले आहेत’, असे हानेबी यांनी बजावले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलविरोधी ठराव सादर केले जात असून त्यांना मोठे समर्थन मिळत आहे. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघ तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयात इस्रायलच्या विरोधात बहुमताने ठराव संमत करण्यात आलेले आहेत. जर्मनी, फ्रान्स या मित्रदेशांनी देखील इस्रायलच्या विरोधात मतदान केले होते. त्यावर इस्रायलकडून ही प्रतिक्रिया आली असून यामुळे इस्रायल इराणवर हल्ल्याची धमकी देत असल्याचे दिसते.

English हिंदी

leave a reply