इस्रायलच्या दिशेने हजारो रॉकेट्स रोखलेले आहेत

- इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या प्रमुखांचा इशारा

हजारो रॉकेट्सतेहरान – गेल्या काही वर्षांमध्ये पॅलेस्टिनींनी त्यांची लष्करी सज्जता वाढविली असून इस्रायलच्या कुठल्याही भागापर्यंत पॅलेस्टिनींचे रॉकेट्स पोहोचू शकतात. त्यामुळे पॅलेस्टिनींच्या रॉकेट हल्ल्यांपासून इस्रायली कुठेही सुरक्षित राहू शकत नाही. या इस्रायलविरोधी कारवाईत हिजबुल्लाहच्या रॉकेट्सची भर घातली, तर हजारो रॉकेट्स इस्रायलच्या दिशेने रोखलेली असल्याचे लक्षात येईल, असा इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांनी दिला.

इराणच्या सरकारी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या प्रमुखांनी गाझापट्टी व वेस्ट बँकमध्ये इस्रायलविरोधात सशस्त्र आघाडी उभी राहत असल्याचे बजावले. तसेच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला गाझा व वेस्ट बँकमधून इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांचे तसेच निदर्शनांचे सलामी यांनी स्वागत केले. गाझातील हमास, लेबेनॉनमधील हिजबुल्लाहने इस्रायलविरोधात शेकडो, हजारो रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे रोखलेली होती, असा इशारा याआधीच दिला होता.

दरम्यान, गाझा व लेबेनॉनमधून रॉकेट हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन इस्रायलने उत्तर तसेच पश्चिमेकडील सीमेवर आयर्न डोम तसेच इतर हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या आहेत. असे असले तरी हमास, हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांना इराणकडून मिळणारे सहाय्य इस्रायलसह जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे इस्रायलने याआधी बजावले होते.

leave a reply