सिरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणावर इस्रायलच्या तोफांचे जोरदार हल्ले

- इराणमध्ये हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

बैरूत – इस्रायल-सिरियाला जोडणाऱ्या कुनित्रा सीमाभागात सोमवारी सकाळी तोफांचे जोरदार हल्ले झाले. हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणावर इस्रायलने हे हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. यानंतर कुनित्रामध्ये हवेतून फेकलेल्या पत्रकात सिरियन लष्कराला हिजबुल्लाहपासून दूर राहण्याचा आणि सहकार्य नाकारण्याचा इशारा दिला होता. एरवी इस्रायलवर हल्ल्यांचे आरोप करणाऱ्या सिरियन सरकारने कुनित्रामधील हल्ल्यांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. दरम्यान, सिरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणावर हल्ले सुरू असताना शेकडो किलोमीटर अंतरावरील इराणने आपली हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्याच्या बातम्या आल्या आहेत.

सिरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणावर इस्रायलच्या तोफांचे जोरदार हल्ले - इराणमध्ये हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वितसिरियातील गोलान टेकड्यांच्या भागात ड्रूझवंशियांची वस्ती असलेल्या हादेर या शहरात सोमवारी सकाळी तोफांचे हल्ले झाले. इस्रायलच्या हद्दीतील गोलान टेकड्यांवर तैनात असलेल्या इस्रायली लष्कराने हे हल्ले चढविले. येथील हिजबुल्लाहच्या ठिकाणाला इस्रायली तोफांनी लक्ष्य केल्याची माहिती ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने दिली. हिजबुल्लाह तसेच हिजबुल्लाहसंलग्न गटाचे दहशतवादी यात मारले गेल्याची तसेच शस्त्रसाठ्याचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते. गेल्या दोन महिन्यात इस्रायलने सिरियात चढविलेला हा नववा हल्ला ठरतो.

आत्तापर्यंत सिरियात होणाऱ्या हल्ल्यांसाठी इस्रायलवर आरोप करणाऱ्या अस्साद राजवटीच्या मुखपत्रांनी सोमवारच्या हल्ल्याची बातमी दिलेली नाही. मात्र या हल्ल्यात हिजबुल्लाहची जबर हानी झाल्याचा दावा लष्करी विश्लेषक करीत आहेत. सिरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणावर इस्रायलच्या तोफांचे जोरदार हल्ले - इराणमध्ये हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वितइस्रायलच्या लष्कराने या दाव्यांवर कुठल्याही स्वरुपाची प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने कुनित्रा भागात पत्रके ‘एअर ड्रॉप’ केल्याची माहिती समोर आली आहे.

अरबी भाषेत असलेल्या या पत्रकात सिरियन लष्कराला इशारा दिला आहे. ‘सिरियन लष्कर आणि हिजबुल्लाहमध्ये असलेल्या सहकार्यावर आमची करडी नजर आहे. पण यापुढे इस्रायलच्या सीमेजवळ तळ ठोकणाऱ्या हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना सिरियन लष्कराने अजिबात सहाय्य करू नये. अन्यथा या सहकार्याची किंमत सिरियन लष्करालाही चुकती करावी लागू शकते’, असा इशारा या पत्रकात देण्यात आलेला आहे. याआधीही सिरियन लष्कराला इराण व हिजबुल्लाहपासून दूर राहण्याचा इशारा इस्रायलने दिला होता.

दरम्यान, सिरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर इस्रायलचे हल्ले सुरू असताना, इराणने इस्फाहन येथील लष्करी तळातील हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली होती, अशी माहिती इस्रायली रेडिओने प्रसारित केली. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या तळावर ड्रोन हल्ल्याची शक्यता वर्तवून इथे विमानभेदी यंत्रणा सज्ज ठेवलेली होती, असा दावा या बातमीत करण्यात आला होता.

leave a reply