जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल व ‘बीएसएफ’ महासंचालकांकडून सीमासुरक्षेचा आढावा

जम्मू  – जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी कठुआतील हिरानगर सेक्टरमधील ‘बीएसएफ बॉर्डर पोस्ट’ला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. त्यापूर्वी मंगळवारी सीमासुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी, बांदीपोरा आणि कुपवाडामधील ‘फॉरवर्ड डिफेन्स लोकेशन’ला (एफडीएल) भेट देऊन सुरक्षा उपाययोजनांची पाहणी केली. चीन व पाकिस्तान भारताविरोधात योजना आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून नुकतीच देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ‘बीएसएफ’ चे प्रमुख व त्यापाठोपाठ उपराज्यपालांनी दिलेली भेट महत्वाची ठरते.

सीमासुरक्षा

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज कठुआतील हिरानगर सेक्टरमधील बीएसएफच्या सीमा चौकीस भेट दिली. यावेळी बीएसएफच्या ‘आयजीं’नी त्यांना सुरक्षाविषयक सज्जता व आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी उचलण्यात आलेल्या योजनांचे सादरीकरण केले.त्यापूर्वी मंगळवारी सीमासुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी, बांदीपोरा व कुपवाडाला भेट दिली. सीमेच्या सुरक्षेत सीमासुरक्षादल आघाडीवर असल्याने ‘बीएसएफ’ची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी जवानांना सांगितले. त्यांनी सीमेवरील सुरक्षादलाच्या तयारीची आणि सद्य स्थितीची माहितीही घेतली.

सीमासुरक्षा

गेल्या आठवड्यात शुक्रवारी अस्थाना राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर, ‘सैनिक सम्मेलन’ला संबोधित करताना त्यांनी चीन व पाकिस्तानचे थेट नाव न घेता, भारताविरोधात सुरू असणाऱ्या कारस्थानांचा उल्लेख केला होता. शेजारी देशांच्या कारवाया रोखण्यात बीएसएफची भुमिका महत्वाची ठरते, असेही अस्थाना यांनी म्हटले होते.

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेअंतर्गत कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना शस्त्रस्त्रांसह अटक करण्यात आली. या कारवाईत दोन एके-४७ रायफल व मॅगझीन, चिनी बनावटीची सहा पिस्तुले व १२ मॅगझीन्स व ‘एम४- यूएस कार्बाईन’ जप्त करण्यात आले आहे.

leave a reply