जपान-ऑस्ट्रेलिया अमेरिका-फिलिपाईन्ससह साऊथ चायना सीमध्ये गस्त घालणार

जपान-ऑस्ट्रेलियावॉशिंग्टन – ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील चीनच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी फिलिपाईन्स सहकारी देशांची आघाडी उभारत आहे. या सागरी क्षेत्रातील अमेरिकेबरोबरच्या युद्धसरावामध्ये जपान आणि ऑस्ट्रेलियालाही सामील करून घेण्यासाठी फिलिपाईन्सचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील फिलिपाईन्सचे राजदूत जोस मॅन्यूअल रोमुआल्देझ यांनी ही माहिती दिली.

‘साऊथ चायना सी’मधील सागरी वाहतूकीचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी या युद्धसरावाची आवश्यकता आहे. संयुक्त युद्धसरावाद्वारे हा हेतू साध्य होऊ शकतो व यासाठी जपान आणि ऑस्ट्रेलियाबरोबर चर्चा सुरू असल्याचे फिलिपाईन्सच्या राजदूतांनी सांगितले. अमेरिका आणि फिलिपाईन्समध्ये नव्याने लष्करी सहकार्य प्रस्थापित होत आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांच्या युद्धनौकांचा सरावही पार पडला होता. पण फिलिपाईन्सने अमेरिकेसह जपान व ऑस्ट्रेलियाबरोबरही संयुक्त युद्धसराव आयोजित केला तर तो चीनसाठी इशारा ठरेल.

अमेरिका-फिलिपाईन्समधील युद्धसराव तसेच या क्षेत्रातील अमेरिकन युद्धनौकांच्या गस्तीवर चीनकडून सातत्याने ‘वॉर्निंग’ दिल्या जात आहेत. काही आठवड्यांपूर्वी चीनने फिलिपाईन्सच्या गस्तीनौकांवर ‘लेझर बीम’ रोखले होते. अशा परिस्थिततीत अमेरिका-फिलिपाईन्ससह जपान व ऑस्ट्रेलियाचा युद्धसरावातील समावेश या क्षेत्रात तणाव वाढविणारा ठरेल.

leave a reply