कम्युनिस्ट पार्टीच्या ठरावानंतर शी जिनपिंग यांची चीनवरील पकड अधिक घट्ट

बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने गुरुवारी मंजूर केलेल्या विशेष ठरावानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची देशावरील पकड अधिक घट्ट झाल्याचे सांगण्यात येते. ‘द डॉक्युमेंट’ म्हणून ओळखण्यात येणारा हा ठराव मंजूर होण्याची कम्युनिस्ट पार्टीच्या इतिहासातील ही तिसरी घटना ठरते. यापूर्वी १९४५ साली पार्टीचे संस्थापक माओ व त्यानंतर १९८१ साली डेंग शाओपिंग यांच्यासाठी कम्युनिस्ट पार्टीने विशेष ठराव मंजूर केला होता.

कम्युनिस्ट पार्टीच्या ठरावानंतर शी जिनपिंग यांची चीनवरील पकड अधिक घट्टचीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल कमिटीचे चार दिवसांचे अधिवेशन नुकतेच राजधानी बीजिंगमध्ये पार पडले. या अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात सेंट्रल कमिटीच्या सुमारे ३५० सदस्यांनी जिनपिंग यांना महत्त्वाचे स्थान देणारा ठराव मंजूर केला. ‘शी जिनपिंग यांची विचारसरणी म्हणजे चिनी संस्कृतीचे सार आहे. ही विचारसरणी अत्यंत महत्त्वाची असून चीनला एक राष्ट्र म्हणून नवचैतन्य देणारी ठरली आहे. कम्युनिस्ट पार्टी, चीनचे लष्कर व देशातील सर्व वंशाच्या नागरिकांनी कॉम्रेड शी जिनपिंग यांचे नेतृत्त्व असलेल्या पक्षाच्या सेंट्रल कमिटीभोवती एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्रितरित्या शी जिनपिंग यांनी तयार केलेल्या व चिनी वैशिष्ट्यांचा समावेश असलेल्या समाजवादाच्या नव्या पर्वाच्या अंमलबजावणीसाठी हातभार लावायला हवा’, असे कम्युनिस्ट पार्टीने आपल्या ठरावात म्हटले आहे.

कम्युनिस्ट पार्टीच्या ठरावानंतर शी जिनपिंग यांची चीनवरील पकड अधिक घट्टजिनपिंग यांच्या नावाने मंजूर केलेला हा ठराव म्हणजे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून इतिहासाचे पुनर्लेखन करून भविष्य जिनपिंग यांच्याभोवती केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न आहे, असा दावा हॉंगकॉंगमधील विश्‍लेषक जीन-पिएरे कॅबेस्टन यांनी केला. गेल्या दशकात कम्युनिस्ट पार्टी व चीनच्या सत्तेची सूत्रे हातात घेणार्‍या शी जिनपिंग यांनी गेल्या काही वर्षात सातत्याने पक्ष, लष्कर व देशावर आपली पकड अधिकाधिक घट्ट करणारे निर्णय घेतल्याचेकडेही विश्‍लेषकांनी लक्ष वेधले.

२०१८ साली जिनपिंग यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी असलेली वयाची व कालावधीची मुदत रद्द केली होती. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टीच्या विचारसरणीमध्ये ‘शी जिनपिंग थॉट’ म्हणून आपल्या धोरणांचा व विचारांचा समावेश करणे भाग पाडले होते. जिनपिंग यांनी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’वर नियंत्रण असणार्‍या ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’चे प्रमुख पदही आपल्याकडे घेण्यात यश मिळविले होते. आता माओ व शाओपिंग यासारख्या दिग्गज नेत्यांच्या पंक्तीत आपले नाव सामील करून जिनपिंग यांनी पक्ष व देशातील आपले स्थान मजबूत केल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला आहे. जिनपिंग यांच्या या हालचालींमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा ‘लीडरशिप कल्ट’ तयार होईल, असे संकेतही देण्यात येत आहेत.

leave a reply