म्यानमारच्या सागाइंग, थातलांगमध्ये जुंटा लष्कराचे जनतेवर हल्ले

- सुमारे २०० जणांचे अपहरण, १०० घरांची जाळपोळ

सागाइंगनेपित्यो  – म्यानमारमधील लोकशाहीवादी सरकार उधळून सत्तेचा ताबा घेणार्‍या जुंटा राजवटीचे अत्याचार अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसात जुंटा लष्कराने सागाइंग भागातून २०० स्थानिकांचे अपहरण केले असून यामध्ये ८५ मुलांचा समावेश आहे. तर थातलांग भागात म्यानमारच्या लष्कराने किमान १०० घरांना आगी लावल्याचा आरोप स्थानिकांनी केला. दरम्यान, म्यानमारची जनता याविरोधात आक्रोश करीत असताना, बायडेन प्रशासनाने वॉशिंग्टन येथे होणार्‍या असियान देशांच्या विशेष बैठकीमध्ये जुंटा राजवटीच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले आहे.

म्यानमारच्या सागाइंग प्रांतातील चिनपोने गावात म्यानमारच्या लष्कराने सलग तीन दिवस धाडी टाकल्या. लष्कराने ८५ मुलांसह २०० जणांचे अपहरण करून त्यांना ओलिस धरले आहे. यामध्ये पाच वर्ष वयोगटातील मुलांचा सर्वाधिक समावेश असल्याचा दावा केला जातो. या कारवाईला विरोध करणार्‍यांवर लष्कराने केलेल्या गोळीबारात नऊ जणांचा बळी गेला. या गावातील नागरिक जुंटा राजवटीविरोधात सशस्त्र उठाव कणार्‍या ‘पिपल्स डिफेन्स फोर्स-पीडीएफ’शी संलग्न होते. त्यामुळे लष्कराने ही कारवाई केल्याचा आरोप होत आहे.

पश्‍चिम म्यानमारच्या चिन प्रांतातील थातलांग भागात लष्कराने शंभरहून अधिक घरांची जाळपोळ केली. गेल्या महिन्याभरात म्यानमारच्या लष्कराने चिन प्रांतातील वेगवेगळ्या भागात २६ वेळा आगी लावल्याचा आरोप केला जातो. यापैकी थातलांग भागाला जुंटा राजवटीने विशेष लक्ष्य केल्याची टीका केली जाते. काही महिन्यांपूर्वी चिन प्रांतातील बंडखोरांनी जुंटा राजवटीच्या जवानांवर हल्ला चढवून त्यांना मोठी हानी सोसण्यास भाग पाडले होते. म्यानमारच्या लष्कराचे हेलिकॉप्टरही लोकशाहीवादी बंडखोरांनी पाडले होते. यानंतर सूडाने पेटलेल्या म्यानमारच्या लष्कराने थातलांग भागातील जनतेला लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

सागाइंगचिन प्रांताप्रमाणे वायव्येकडील मागवे प्रांतातही म्यानमारच्या लष्कराकडून भीषण कारवाया सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. दोन दिवसांपूर्वी येथील गांगो भागात लष्कराने टाकलेल्या धाडीत १० जणांची निघृणरित्या हत्या करण्यात आली होती. तर गेल्या महिन्यात लष्कराने मागवे प्रांतात हवाई हल्ले चढविल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. म्यानमारच्या इतर प्रातांप्रमाणे मागवेमधील सशस्त्र टोळ्या जुंटा राजवटीविरोधात संघर्ष करीत आहेत. ‘पीडीएफ’शी जोडलेल्या टोळ्या लष्कर तसेच पोलीस दलांवर हल्ले चढविच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. यामध्ये लष्कराचे ३० जवान मारले गेल्याचा दावा केला जातो.

वर्षभरापूर्वी म्यानमारच्या लष्कराने अँग स्यॅन स्यू की यांचे लोकशाहीवादी सरकार उधळले होते. त्यानंतर सत्तेचा ताबा घेणार्‍या जुंटा राजवटीने म्यानमारमध्ये आपल्या विरोधकांवर कारवाई सुरू ठेवली आहे. याची माहिती जगजाहीर होऊ नये, यासाठी जुंटा राजवटीने आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक माध्यमांवर बंदी टाकली आहे. तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून जुंटा राजवटीच्या कारवाया जगासमोर येत आहेत.

दरम्यान, लोकशाहीवादी सरकार उलथून सत्तेचा ताबा घेणार्‍या जुंटा राजवटीच्या प्रतिनिधींना अमेरिकेने ‘असियान’च्या बैठकीत बोलाविले आहे. येत्या २८-२९ मार्च रोजी बायडेन प्रशासनाने वॉशिंग्टनमध्ये असियान देशांची विशेष बैठक बोलाविली आहे. याद्वारे बायडेन प्रशासन म्यानमारच्या जुंटा राजवटीला मान्यता देत असल्याची टीका होत आहे. मानवाधिकारांचा पुरस्कार करणार्‍या बायडेन प्रशासनापर्यंत म्यानमारच्या जनतेचा आक्रोश पोहोचत नसल्याचे यामुळे उघड झाले आहे.

leave a reply