पंजाब, पश्‍चिम बंगाल आणि आसामधील ‘बीएसएफ’चे अधिकार क्षेत्र वाढले

- केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी

नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान व भारत-बांगलादेशमधील सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) पंजाब, पश्‍चिम बंगाल आणि आसाममधील अधिकार क्षेत्रात वाढ करण्यात आहे. आता सीमेपासून ५० किलोमीटरचे क्षेत्र हे बीएसएफच्या अधिकार क्षेत्राखाली असेल. या एवढ्या क्षेत्रापर्यंत बीएसएफ पोलिसांप्रमाणे तपासणी, जप्ती व अटकेची कारवाई करू शकेल. यासाठी स्थानिक प्रशासन व पोलिसांची परवानगी घेण्याची बीएसएफला आवश्यकता नसेल. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाने बीएसएफला राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक ठरू शकणार्‍या बेकायदा कारवायांविरोधात कारवाई हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पंजाब सीमेवर ड्रोन व इतर मार्गाने पाकिस्तानातून शस्त्रास्त्रांची व अमली तस्करी वाढली आहे. तसेच पश्‍चिम बंगाल व आसामच्या सीमाभागात घुसखोरी, अमली पदार्थ तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात करण्यात आलेली वाढ महत्त्वाची ठरते.

पंजाब, पश्‍चिम बंगाल आणि आसामधील ‘बीएसएफ’चे अधिकार क्षेत्र वाढले - केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारीकेंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी एक अधिसूचना काढून पंजाब, पश्‍चिम बंगाल आणि आसाममधील बीएसएफचे अधिकार क्षेत्र वाढविले. यानुसार सीमेपासून ५० किलोमीटरच्या क्षेत्रात कारवाई करण्याचा, तपासणी, अटक व जप्ती करण्याचा अधिकार बीएसएफला मिळाला आहे. याआधी या राज्यात बीएसएफचे अधिकार क्षेत्र सीमेपासून १५ किलोमीटर इतके होते. इतर देशांना भूसीमा लागून असलेल्या १० जिल्ह्यात व दोन केंद्रशासित प्रदेशात बीएसएफ व सुरक्षादलांचे अधिकार क्षेत्र निरनिराळे आहे. बुधवारी काढण्यात आलेल्या अधिसूचनेत काही राज्यातील बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात घट करण्यात आली आहे. तर काही राज्यात अधिकार क्षेत्र पुर्वी होते तितकेच कायम ठेवण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालॅण्ड आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यातील बीएसएफचे अधिकार क्षेत्र ३० किलोमीटरने कमी करून ५० किलोमीटर केले आहे. याआधी हे अधिकार क्षेत्र ८० किलोमीटर इतके होते. गुजरातमधीलही बीएसएफचे अधिकार क्षेत्र ८० किलोमीटरवरून कमी करून ५० किलोमीटर करण्यात आले आहे. तर राजस्थानात आधिपासून ५० किलोमीटरचे क्षेत्र बीएसएफच्या अधिकाराखाली असून ते कायम ठेवण्यात आले आहे. तसेच जम्मू-काश्मीर व लडाख या कंेंद्रशासित प्रदेशातही हे अधिकार क्षेत्र ५० किलोमीटर आहे. एकप्रकारे बीएसएफच्या अधिकाक्षेत्रात एकसारखेपणा आणण्यात आला आहे.

गेल्या काही काळात पंजाबमध्ये संरक्षणविषयक आव्हाने वाढलेली पाहायला मिळाली आहेत. कित्येक टेरर मॉड्यूल सुरक्षादल व तपास संस्थांनी उद्ध्वस्त केली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणे व तस्करी करणे सुरक्षादलांच्या कारवाईमुळे कठीण जात असताना पंजाबमध्ये दहशतवाद्यांनी मोर्चा वळविला आहे. पाकिस्तानातून पंजाब पुन्हा अशांत करण्यासाठी कट रचला जात असल्याचे दहशतवादी मॉड्यूल्स उद्ध्वस्त झाल्यानंतर तपासात उघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर बीएसएफच्या अधिकारातील ही वाढ महत्त्वाची ठरते.

leave a reply