केंद्रीय गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांकडून पाकिस्तानला सज्जड इशारा

नवी दिल्ली/पणजी/इस्लामाबाद – जम्मू व काश्मीरमध्ये घुसखोरी घडवून दहशतवादी कारवायांचे नवे सत्र सुरू करू पाहणार्‍या पाकिस्तानला भारत सज्जड इशारे देत आहे. बेजबाबदार देश दहशतवादाचा वापर आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी करीत असल्याचा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केला आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादी कारवाया करणार्‍या पाकिस्तानात घुसून पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करताना भारत कचरणार नाही, असे बजावले आहे. पाकिस्तानची यावर प्रतिक्रिया आली असून आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताच्या या आक्रमकतेची दखल घ्यावी, असा आरडाओरडा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुरू केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांकडून पाकिस्तानला सज्जड इशाराजम्मू व काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून भारताला धक्का देण्यासाठी पाकिस्तानने जोरदार तयारी केली आहे. अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हाती आल्यानंतर, पाकिस्तानच्या या दहशतवादी हालचालींची तीव्रता अधिकच वाढल्याची नोंद विश्‍लेषक करीत आहेत. अत्याधुनिक रायफलींच्या ऐवजी पिस्तूलाचा वापर करून दहशतवादी पोलीस, शिक्षक तसेच सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले चढवून दहशत माजवित आहेत. सुरक्षा दलांनी याची गंभीर दखल घेऊन काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांच्या विरोधात व्यापक कारवाई हाती घेतली होती. श्रीनगरमध्ये हत्या घडविणारे दहशतवादी या मोहिमेत ठार झाले आहेत.

पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआय या नव्या दहशतवादी हल्ल्यांच्या मागे असून आयएसआयनेच गझनवी फोर्स नावाचा दहशतवाद्यांचा स्वतंत्र गट नव्या प्रकारच्या हल्ल्यांसाठी तयार केल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, याची जाणीव भारत वेगवेगळ्या मार्गाने पाकिस्तानला करून देत आहे. शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओच्या एका व्हर्च्युअल कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी थेट नामोल्लेख टाळून पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर हल्ले चढविले.

‘नॉन स्टेट ऍक्टर्स अर्थात थेट कुठल्याही देशाशी संबंध नसलेल्या दहशतवाद्यांचा वापर करून काही बेजबाबदार देश आपले राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे सुरक्षेची पारंपरिक संकल्पना आता पूर्णपणे बदलेली आहे. सुरक्षा ही केवळ सीमेपुरती मर्यादित असलेली बाब राहिली नसून आता देशातून मिळणार्‍या आव्हानांकडेही सुरक्षेला मिळणारे आव्हान म्हणून पहावे लागत आहे. दहशतवाद हे त्याचेच उदाहरण ठरते’, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले.

अफगाणिस्तानातील तालिबान व इतर दहशतवादी गटांचा भारताच्या विरोधात वापर करू पाहणार्‍या पाकिस्तानला याद्वारे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष्य केल्याचे दिसत आहे. संरक्षणमंत्री एससीओच्या बैठकीत पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर असे प्रहार करीत असताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पणजी येथील एका कार्यक्रमात पाकिस्तानला थेट इशारा दिला. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला भारत अधिक समर्थपणे उत्तर देत असून उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केली होती, याची आठवण अमित शहा यांनी करून दिली. पुन्हा असा हल्ला चढविताना भारत कचरणार नाही, असे गृहमंत्र्यांनी पाकिस्तानला बजावले.केंद्रीय गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांकडून पाकिस्तानला सज्जड इशारा

यावर पाकिस्तानातून प्रतिक्रिया आली असून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताच्या आक्रमकतेची दखल घेण्याचे आवाहन केले. पाकिस्तान शांतीप्रिय देश आहे, मात्र पाकिस्तान आपल्या विरोधातील कारवाया हाणून पाडल्यावाचून राहणार नाही, असे दावे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केले. त्याचवेळी जम्मू व काश्मीरच्या जनतेवर भारत करीत असलेल्या अत्याचारांकडून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी भारत दहशतवादी हल्ल्यांचा बनाव करीत असल्याचा कांगावा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर कडाडून हल्ले चढविल्याचे दिसत आहे. पाकिस्तान काश्मीरचा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करून भारताची शक्य तितकी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असताना, या देशाचा दहशतवादी चेहरा भारत जगासमोर मांडत आहे. भारतीय नेते थेट नामोल्लेख न करता पाकिस्तानवर करीत असलेल्या या आरोपांचे गंभीर परिणाम होत असून याने आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा धुळीला मिळाल्याची तक्रार पाकिस्तानची माध्यमे करीत आहेत. पाकिस्तानचे राजनैतिक अधिकारी व नेते आपल्या देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचेही पाकिस्तानची माध्यमे मान्य करीत आहेत.

leave a reply