लेबेनॉनमधील गोळीबारात सहा ठार

- ३२ निदर्शक जखमी

बैरूत – लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या गोळीबारामध्ये सहा जण ठार झाले तर ३२ जण जखमी झाले. हिजबुल्लाह व अमल या गटांनी आयोजित केलेल्या निदर्शनांवर गोळीबार झाल्याचा आरोप हिजबुल्लाहचे नेते करीत आहेत. पण घटनास्थळावरुन प्रसिद्ध झालेले व्हिडिओ व फोटोग्राफ्समध्ये हिजबुल्लाहचे समर्थक व दहशतवादी हातात रायफल्स तसेच रॉकेट लॉंचर्स घेऊन असल्याचे समोर आले आहे.

लेबेनॉनमधील गोळीबारात सहा ठार - ३२ निदर्शक जखमीगेल्या वर्षी राजधानी बैरूतच्या बंदरात अमोनियम नायट्रेटचा साठा केलेल्या गोदामात भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात २१८ जणांचा बळी गेला तर सात हजार जण जखमी झाले होेते. या स्फोटामुळे १५ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले तर तीन लाख जण बेघर झाल्याचा दावा केला जातो. सदर गोदामात अमोनियम नायट्रेट या ज्वलनशील रसायनाचा बेकायदेशीररित्या साठा केल्याचे आरोप झाले होते. तसेच हिजबुल्लाहने हा साठा केल्याचेही बोलले जात होते.

या घटनेनंतर लेबेनॉनमधील सरकार कोसळले व याची चौकशी सुरू झाली होती. दोन दिवसांपूर्वी लेबेनॉनच्या न्यायालयातील न्यायाधीश तारेक बितार यांनी सदर स्फोटाप्रकरणी तत्कालिन अर्थमंत्री अली हसन खलिल यांच्या अटकेचे आदेश काढले. लेबेनॉनमधील गोळीबारात सहा ठार - ३२ निदर्शक जखमीखलिल हे हिजबुल्लाहचे समर्थक आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळी खलिल यांच्या अटकेच्याविरोधात हिजबुल्लाह व अमल या दोन संघटनांनी बैरूतमध्ये निदर्शने सुरू केली.

या निदर्शनांवेळी गोळीबार झाल्याचा आरोप हिजबुल्लाह करीत आहे. यामागे हिजबुल्लाहचे कडवे विरोधक व खिस्तियन लेबेनीज फोर्सेस मुव्हमेंट असल्याचा आरोप हिजबुल्लाहने केला. राजकीय विरोधामुळे सदर गटाने गोळीबार केल्याचे हिजबुल्लाहचे म्हणणे आहे. पण या गोळीबारामागे वेगळेच कारण असल्याचा दावा लेबेनीज जनता करीत आहे.

लेबेनॉनमधील गोळीबारात सहा ठार - ३२ निदर्शक जखमीहिजबुल्लाहचे समर्थक व दहशतवादी रस्त्यांवर रायफल्स व रॉकेट लॉंचर्ससह वावरत असतानाचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर हिजबुल्लाहच्या वाहनांचा ताफा बैरूतच्या दिशेने जात असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे हिजबुल्लाह लेबेनॉनमध्ये गृहयुद्ध भडकविण्याच्या प्रयत्नात तर नाही ना, असा सवाल हिजबुल्लाहचे विरोधक करीत आहेत. गेल्या वर्षी बैरूतमध्ये झालेला स्फोट आणि गुरुवारी झालेल्या गोळीबाराची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी लेबेनॉनमधील हिजबुल्लाहविरोधी राजकीय पक्ष करीत आहेत.

leave a reply