दुसऱ्या देशात हत्या घडविणे हे सौदीचे नाही, इराणचे धोरण

- सौदीच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांचा हल्लाबोल

हत्या घडविणेरियाध – ‘दुसऱ्या देशात घुसून एखाद्याची हत्या घडविणे, हे इराणचे धोरण आहे. सौदी अरेबियाचे नाही’, असा घणाघाती प्रहार सौदी अरेबियाचे परराष्ट्र राज्यमंत्री अदेल अल-जुबैर यांनी चढविला. त्याचबरोबर आपल्या देशातील प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी सौदीच्या राजवटीला दोषी धरणे ही इराणची जुनी खोड असल्याची टीका जुबैर यांनी केली. दोन दिवसांपूर्वी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या अणुशास्त्रज्ञाच्या हत्येच्या कटात सौदीही सहभागी असल्याचा ठपका ठेवला होता. त्यावर सौदीकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांच्या हत्येसाठी इराणने अमेरिका व इस्रायलवर आरोप केले आहेत. यासाठी इराणच्या अधिकाऱ्यांकडून तसेच सरकारी माध्यमांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. अणुशास्त्रज्ञाच्या हत्येसाठी वापरली गेलेली इस्रायली बनावटीची शस्त्रास्त्रे देखील सापडल्याचा दावा इराणी अधिकाऱ्यांनी केला. इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये या हत्याकांडाचा कट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या तथाकथित भेटीत आखला गेल्याचा आरोपही केला.

इराणी परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या या आरोपांवर सौदीने संताप व्यक्त केला आहे. इराणमधील प्रत्येक चुकीच्या घडामोडींसाठी सौदीच्या राजवटीला दोषी धरणारे इराणचे परराष्ट्रमंत्री झरीफ हे उतावीळपणे खोटे आरोप करीत असल्याची टीका जुबैर यांनी केली. ‘इराणमध्ये जे काही चुकीचे घडते, त्यासाठी सौदी अरेबियाच्या राजवटीला दोषी धरणे ही इराणचे परराष्ट्रमंत्री झरीफ यांची जुनी खोड आहे. तसे असेल तर मग येत्या काळातील भूकंप किंवा पुरासाठी देखील सौदीलाच जबाबदार धरणार का?’, असा सवाल जुबैर यांनी केला.

हत्या घडविणे

त्याचबरोबर इतर देशांमध्ये हत्या घडविणे, हे इराणचे धोरण असल्याचा ठपका जुबैर यांनी ठेवला. ‘1979 साली आयातुल्ला खोमेनी यांनी घडविलेल्या क्रांतीनंतर इराणने इतर देशांमध्ये अनेक हत्याकांड घडविली आहेत. इराणच्या या हत्याकांडामध्ये, बेकायदा कारवायांमध्ये आपले नागरिक गमावणारे सौदीसारखे इतर देश याबाबत नक्कीच माहिती देतील. पण इराणप्रमाणे इतरांच्या देशात घुसून हत्याकांड घडविणे हे सौदीचे धोरण नाही’, असा हल्ला जुबैर यांनी चढविला. जुबैर यांनी सोशल मीडियातून केलेल्या या टीकेवर इराणकडून प्रतिक्रिया आलेली नाही.

1979 सालच्या झालेल्या क्रांतीनंतर इराणच्या राजवटीने आशिया, युरोप, अमेरिका आणि लॅटिन अमेरिकामध्ये घडविलेल्या हत्या आणि हल्ल्यांमध्ये किमान 21 महत्त्वाच्या व्यक्ती तर शेकडो जण मारले गेल्याचा आरोप केला जातो. यामध्ये ज्यूवंशिय, अरब तसेच पाश्‍चिमात्य देशातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. तर 2011 साली जुबैर अमेरिकेतील सौदीचे राजदूत असतानाच, इराणने त्यांच्या हत्येचा कट आखल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. याप्रकरणी अमेरिकेने हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांनी आपला गुन्हा कबुल केल्याचेही अमेरिकेने जाहीर केले होते.

दरम्यान, इस्रायल व सौदीच्या नेत्यांमध्ये झालेल्या भेटीबाबत माध्यमांमध्ये बरेच काही प्रसिद्ध होत असले तरी या दोन्ही देशांनी अधिकृतरित्या या वृत्ताला मान्यता दिलेली नाही. सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशी भेट झालीच नसल्याचे म्हटले होते. तर इस्रायलच्या सरकारने देखील सदर भेटीला अधिकृत पातळीवर दुजोरा देण्याचे टाळले आहे.

leave a reply