इस्रायलबरोबरच्या शांतीकरारावरुन तुर्की-इराणची ‘युएई’ला धमकी

अंकारा/तेहरान – ‘संयुक्त अरब अमिरात’ने (युएई) इस्रायलबरोबर शांती प्रस्थापित करुन सहकार्य वाढविण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाचे जगभरातून स्वागत होत असताना, तुर्की व इराण या देशांनी ‘युएई’ला धमकावले आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी ‘युएई’शी असलेले राजनैतिक संबंध तोडून आपल्या राजदूताला माघारी बोलाविण्याची धमकी दिली. तर हा शांतीकरार करणार्‍या ’युएई’ने भविष्यातील भीषण परिणामांसाठी तयार रहावे, असा इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसने दिला आहे.

शांतीकरार

इस्रायल व युएईमध्ये झालेल्या ऐतिहासिक शांतीकरारावर तुर्कीने जोरदार टीका केली आहे. इस्रायलशी शांती प्रस्थापित करुन युएई’ने पॅलेस्टिनींच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका तुर्कीने केली होती. या चुकीसाठी इतिहास ‘युएई’ला कधीही माफ करणार नाही, असे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, युएई’ने पॅलेस्टिनींशी केलेल्या या गद्दारीचे अजिबात समर्थन करता येणार नाही. या निर्णयानंतर तुर्की लवकरच युएईबरोबरचे राजनैतिक संबंध तोडण्यात येतील, असे जाहीर केले.

त्याचबरोबर तुर्की युएईतील आपल्या राजदूतांना माघारी बोलाविण्याबाबतही तुर्की विचार करीत असल्याचे एर्दोगन म्हणाले. युएईला धमकावत असताना, तुर्कीने गाझापट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांना आश्रय देण्यास सुरुवात केली आहे. यापैकी काही दहशतवाद्यांवर इस्रायलमध्ये हल्ले चढविण्याचा कट रचल्याचा आरोप असल्याची माहिती समोर येत आहे. याआधीही तुर्कीने हमासच्या दहशतवाद्यांना सहाय्य केल्याचा आरोप झाला होता.

शांतीकरार

तर इस्रायलशी शांती करार करुन ‘युएई’ने सर्वात मोठी चूक केल्याची टीका इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी केली. तर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसने ‘युएई’ला धमकावले. सदर शांतीकरार म्हणजे अमेरिकेचा सैतानी डावपेच असून याचे गंभीर परिणाम युएईला भोगावे लागतील, अशी धमकी रिव्होल्युशनरी गार्डसने दिली. त्याचबरोबर या शांतीकराराबरोबर अमेरिकेचा आखातातील प्रभाव वाढेल, असा दावा इराणच्या प्रमुख लष्करी गटाने केला.

दरम्यान, इस्रायलबरोबर शांतीकरार केल्यामुळे ‘युएई’च्या संरक्षण क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल. या दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढून युएईला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी करता येईल, असा दावा इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड फ्रिडमन यांनी केला. तर इस्रायल व युएईतील हे सहकार्य आपल्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका असल्याची चिंता इराणला सतावित आहे. त्यामुळे इराणने सदर शांतीकरारावर जोरदार टीका सुरू केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

leave a reply