अमेरिकी सायबरसुरक्षा कंपनी ‘फायर आय’वर मोठा सायबरहल्ला

- रशियाचा हात असल्याचा संशय

‘फायर आय’वॉशिंग्टन – जगातील आघाडीच्या सायबरसुरक्षा कंपन्यांपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या ‘फायर आय’ या अमेरिकी कंपनीवर मोठा सायबरहल्ला झाला आहे. ही कंपनी अमेरिकेच्या संरक्षण विभागासह अनेक सरकारी विभाग, आघाडीच्या कंपन्या तसेच जगाच्या विविध भागातील आरोग्य यंत्रणांना सायबरसुरक्षा पुरविण्याचे काम करते. कंपनीकडे असलेल्या ग्राहकांपैकी काही सरकारी विभागांशी निगडीत माहिती मिळविण्यासाठी हा हल्ला झाला असावा, असे मानले जाते. कंपनीने आपल्या निवेदनात थेट कोणत्या देशाचे नाव घेतले नसले तरी काही सूत्रांनी रशियाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

‘फायर आय’कंपनीचे प्रमुख केव्हिन मँडिया यांनी एका निवेदनाद्वारे सायबरहल्ल्याची माहिती जाहीर केली. त्यात त्यांनी, अत्यंत प्रगत तंत्रज्ञान असलेल्या व सरकारी यंत्रणांचे पाठबळ असलेल्या गटाने हल्ला केल्याचा दावा केला. हल्लेखोरांनी यापूर्वी कधीही न वापरण्यात आलेले तंत्रज्ञान वापरून हल्ला केला आहे, असेही मँडिया यांनी स्पष्ट केले. कंपनीकडून आपल्या ग्राहकांच्या यंत्रणांची सायबरसुरक्षा तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘रेड टीम ॲसेसेमेंट टूल्स’ना लक्ष्य करण्यात आल्याचेही कंपनीने सांगितले. हे लक्ष्य करण्यामागे कंपनीचे ग्राहक असलेल्या सरकारी विभागांशी निगडीत माहिती मिळविण्याचा प्रयत्न असू शकतो, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

‘फायर आय’

कंपनीच्या निवेदनात कोणत्याही देशाचे नाव घेण्यात आले नसले तरी सूत्रांनी यामागे रशियाचा हात असू शकतो, असे संकेत दिले आहेत. अमेरिकेतील काही प्रसारमाध्यमांनी रशियाच्या ‘एसव्हीआर’ या गुप्तचर यंत्रणेचा हल्ल्यात हात असल्याचा दावा केला आहे.यापूर्वी रशियाकडून अमेरिका व मित्रदेशांवर झालेले अनेक सायबरहल्ले उघड करण्यात ‘फायर आय’ने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचवेळी रशियन सायबरहल्ल्यांच्या तपासातही या कंपनीने सहकार्य केले होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ने रशियाकडून सायबरहल्ला होण्याची शक्यता असल्याचा ‘अलर्ट’ही दिला होता.

‘फायर आय’वर झालेल्या सायबरहल्ल्याचा तपास ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफबीआय) हाती घेतला असून त्यात मायक्रोसॉफ्टही सहकार्य करीत असल्याचे सांगण्यात आले.

leave a reply