अफगाणिस्तानचा ताबा तालिबानकडे आल्यानंतर अमली पदार्थांच्या व्यापारात लक्षणीय वाढ

- पाश्‍चिमात्य माध्यमांचा दावा

लंडन/बर्लिन/काबुल – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर, या देशाची अर्थव्यवस्था कोसळली असून बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली. या देशातील अधिकृत उद्योगव्यवसाय मृत्यूपंथाला लागलेले असताना, तालिबानच्या राज्यात अमली पदार्थांचा व्यापार मात्र जोर पकडत आहे. उपासमारीची वेळ ओढावलेले अफगाणी शेतकरी आता अफूच्या शेतीकडे वळल्याच्या बातम्या काही काळापूर्वी आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे वेळीच लक्ष पुरविले नाही तर अमली पदार्थांचा व्यापार अधिकच फोफावेल, असा इशारा माध्यमे देत आहेत.

गेल्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर या देशात एकच गोंधळ उडाला. आंतरराष्ट्रीय संघटनांनी तातडीने अफगाणिस्तानातून पळ काढला. तर तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणिस्तानातील कारखाने, उद्योगधंदे तसेच छोटीमोठी दुकाने बंद झाल्यामुळे लाखो जण बेरोजगार झाल्याचा दावा ‘डॉईश वेले’ या जर्मन वृत्तवाहिनीने केला आहे.

बेरोजगारीमुळे अफगाणींसमोर नव्या समस्या देखील निर्माण झाल्या. आपल्या कुटुंबियांचे भरणपोषण करण्यासाठी काही अफगाणींनी बेकायदेशीररित्या आपल्या अवयवांची विक्री सुरू केली. तर कुटुंबातील इतर सदस्यांना पोटभर अन्न मिळावे, यासाठी काही अफगाणी पालकांनी आपल्या मुलामुलींना विकल्याच्या हादरवून सोडणार्‍या बातम्याही समोर आल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर काही अफगाणी अफूच्या शेतीकडे वळल्याचा दावा जर्मन वृत्तवाहिनीने केला.

तालिबानने अमली पदार्थांची शेती, व्यापार, तस्करीवर बंदी घोषित केली असली तरी तालिबानची राजवट अफूच्या शेती तसेच त्याच्या व्यापारावर कारवाई करू शकलेली नाही, याकडे या वृत्तवाहिनीने लक्ष वेधले. त्यातच आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनांनी अफगाणिस्तानातून गाशा गुंडाळल्यामुळे अमली पदार्थांच्या व्यापारावरील कारवाई पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील अमली पदार्थांचा व्यापार जोर पकडत असल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला.

सध्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्क्यांहून अधिक अफगाणी अमली पदार्थांचे सेवन करीत असून यापैकी चार ते सहा टक्के पूर्णपणे या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. आंतरराष्ट्रीय संघटनांनी वेळीच अफगाणिस्तानातील अफूची शेती व अमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई केली नाही, तर या देशातील नशेचा व्यापार अधिक विस्तारेल, असा इशारा या माध्यमांनी दिला.

गेल्या आठवड्यात भारतीय नौदल आणि अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ७७२ किलो वजनाचे अमली पदार्थ हस्तगत केले होते. हा सारा माल अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे भारतात तस्करी केला जात असताना सुरक्षा यंत्रणांनी ही कारवाई केली होती. तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील बंदरात तीन टन अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अवघ्या महिन्याभरात ही कारवाई झाली होती.

leave a reply