दुसरे ‘पुलवामा’ घडविण्याच्या कटात ‘मसूद अझहर’च्या भाच्याचा हात

श्रीनगर – दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षादलांनी ‘पुलवामा’पेक्षा भयंकर दहशतवादी हल्ल्या घडविण्याचा कट उधळवून लावला होता. या कटाबाबत महत्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. या कटात सहभागी असलेला ‘हिजबुल मुजाहिद्दीन’चा एक पाकिस्तानी कमांडर मोहम्मद इस्माईल ऊर्फ फौजी ‘ जैश-ए-मोहमद’ चा प्रमुख मौलाना मसूद अजहरचा भाचा असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर हा कटासाठी वापरण्यात आलेली कार ‘हिजबुल’चा दहशतवादी हिदायतुल्ला मलीक याची असल्याची माहिती हाती लागली आहे.

‘हिजबुल मुजाहिद्दीन’ आणि ‘जैश-ए-मोहमद’ या दहशतवादी संघटनांनी जम्मू काश्मीरमध्ये पुलवामापेक्षा भयंकर हल्याचा कट आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. मात्र सुरक्षादलाच्या सतर्कतेमुळे हल्याचा कट उधळवून लावण्यात यश आले. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी वालीद उर्फ मुसा उर्फ इदलीस आणि इस्माईलचा सहभाग असल्याचे समोर आले होते. इस्माईल मूळचा पाकिस्तानच्या बहावलपूरचा रहिवासी असून ‘आयइडी’ बनविण्यात तज्ज्ञ मानला जातो. मुख्य म्हणजे १४ फेब्रुवारी २०१९ साली दहशतवाद्यांनी ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात देखील त्याचा सहभाग असल्याची माहिती उघड झाली आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून ‘आयइडी’साठी आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. तसेच नायट्रिक मीठ, अमोनियम नायट्रेट आणि नायट्रिक ग्लिसरीनचा स्फोटक म्हणून वापर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आत्मघाती हल्ल्याचा कट तडीस नेण्यासाठी ज्या कारमध्ये स्फोटके आणि ‘आयइडी’ बसविण्यात आला होता ती गाडी ‘हिजबुल‘चा दहशतवादी हिदायतुल्ला मलीक याच्या मालकीची असल्याचे तपासात समोर आहे. मलीक हा शोपीयन जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्याच वर्षी ‘हिजबुल’मध्ये सहभागी झाला होता. या प्रकरणी मलीकच्या भावाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशीकरण्यात येत आहे.

सुरक्षादलांने कारचा पाठलाग केल्यावर दहशतवाद्यांनी पुलवामाच्या अयानगुंड भागात स्फोटकाने भरलेली कार तेथेच सोडून पळ काढला होता. त्यानंतर सुरक्षादलाने या संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. हिजबुल आणि जैश हल्ल्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मागील आठवड्याभरापासून मिळत होती. मात्र बुधवारी याबाबत खात्रीशीर खबर माहिती हाती लागल्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आल्याचे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले.

या महिन्याच्या सुरुवातीला हिजबुल मुजाहिदीन दशतवादी रियाज नायकूला ठार मारण्यात आले होते. नायकू ठार झाल्याने आपल्याला फार मोठा हादरा बसल्याची कबुली हिजबुल प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने दिली होती. नायकू ठार झाल्यावर हिजबुलचा कमांडर जुनैद सेहराई याला देखील ठार मारण्यात आले होते. मागील काही महिन्यापासून सुरक्षादलाने दहशतवाद्यांविरोधात हाती घेतलेल्या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांना जबर हादरा बसला आहे. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी या संघटना धडपडत आहेत.

दरम्यान, शनिवारी कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षादलाने कारवाई करत दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र व स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी अन्य दहशतवाद्यांना आसरा देण्यासह एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी साहाय्य करण्याचे काम करत होते.

leave a reply