काबूल विद्यापीठावरील दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंडला अटक

काबूल – अफगाणिस्तानच्या काबूल विद्यापीठावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंडला अफगाणिस्तान यंत्रणांनी अटक केली आहे. तालिबानच्या ‘हक्कानी नेटवर्क’ने हा हल्ला घडविल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. याबाबत अधिक खुलासा अफगाणिस्तानकडून करण्यात आलेला नाही. मात्र पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि हक्कांनी नेटवर्कमधील घनिष्ट संबंध वारंवार उघड झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका वृत्त अहवालात भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने पाकिस्तानची ‘आयएसआय’ या हल्ल्यामागे असल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर काबूल विद्यापीठावरील हल्ल्यामागे ‘हक्कानी नेटवर्क’ असल्याचे उघड झाल्याचे वृत्त लक्षवेधी ठरत आहे.

२ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानाच्या काबूल विद्यापीठाच्या आवारात दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी विद्यापीठाच्या आवारात शिरून अंदाधुंद गोळीबार केला होता. यावेळी २२ जणांचा बळी गेला होता व शंभरहून अधिक जण जखमी झाले होते.. यामध्ये बहुतांश विद्यार्थी होते. सुरक्षादलाच्या कारवाईत हा हल्ला करणारे तीनही दहशतवादी ठार झाले होते. या हल्ल्याच्या कट रचणारा दहशतवाद्याला अटक करण्यात अफगाणी यंत्रणांना यश मिळाले आहे. अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी सोशल मीडियावरुन याची माहिती दिली. उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी या दहशतवाद्यांचे फक्त पहिले नाव जाहीर केले आहे. या दहशतवाद्याचे नाव ‘अदिल’ असल्याची माहिती सालेह यांनी दिली. ‘अदिल’ हा ‘हक्कानी’ नेटवर्कचा सदस्य असल्याचे सालेह म्हणाले.

काबूल विद्यापीठावरील दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंडला अटकया हल्ल्याची जबाबदारी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली होती. पण उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी या हल्ल्यामागे तालिबानचा हात असण्याची शक्यता वर्तविली होती. तालिबानने हा दावा नाकारला होता. मात्र अफगाणिस्तानच्या यंत्रणा यामागे तालिबानचा असल्याचा दावा करीत होत्या. अखेर ‘अदिल’च्या अटकेने आणि त्याच्या ‘हक्कानी’ नेटवर्कबरोबरील संबंधाने हा दावा खरा ठरला आहे.

‘अदिल’चे कुटुंब काबूलच्या ‘पुल-ए-चक्री’ भागात राहते. गेल्या तीन वर्षांपासून ‘अदिल’ बेपत्ता होता. तो शिक्षणासाठी परदेशात गेल्याच्या अफवा पसरविल्या होत्या. पण प्रत्यक्षात तो ‘हक्कानी’ नेटवर्कमध्ये सामील झाला होता. त्याच्या चौकशीत त्याने हा हल्ला घडविल्याचा कबुली दिल्याचा दावा उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी केला. अफगाणिस्तानाच्या सरकारवर दबाव टाकण्यासाठी आणि त्यांना कमकुवत करण्यासाठी हा हल्ला घडविल्याचे अदिल यांनी मान्य केले. आदिलने या हल्ल्यासाठी अफगाणिस्तानाच्या खोस्त प्रांतातून हक्कानी नेटवर्ककडून शस्त्रात्रे घेतल्याचे समोर आले आहे. मात्र हक्कानी नेटवर्कने हा दावा फेटाळला असूनआदिल हक्कानी नेटवर्कचा सदस्य नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात भारतीय गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या एका वृत्त अहवालात काबूल हल्ल्यामागे ‘आयएसआय’चा हात समोर येत आहे, असा दावा करण्यात आला होता. ‘आयएसआय’ अफगाणिस्तानामध्ये तेथे कार्यरत विविध दहशतवादी संघटनांना हाताशी धरून अफगाणिस्तानात हिंसाचार घडवून आणत आहे. अमेरिका तालिबानशी संबंधित अंतिम तोडग्यापर्यंत पोहोचावी आणि तालिबान अफगाणिस्तानात सत्तेत स्थापित व्हावा, यासाठी दबाव वाढविण्यासाठी हे हल्ले घडविण्यात येत आहेत. त्यामुळे पुढील काळात असेच आणखी हल्ले होण्याची शक्यता भारतीय गुप्तचर संस्थांनी वर्तविल्याचे या अहवालात म्हटले होते.

leave a reply