तुर्की व युक्रेनमध्ये लष्करी सहकार्य करार

इस्तंबूल – तुर्कीने युक्रेनबरोबर लष्करी सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. करार करतानाच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी, क्रिमियावरील रशियाचा ताबा बेकायदा असल्याचे सांगून तुर्की त्याला कधीही मान्यता देणार नसल्याचा इशारा दिला. युक्रेनबरोबरील करार व क्रिमियाबाबतचे वक्तव्य या दोन्ही गोष्टी तुर्कीकडून रशियाला आव्हान देण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जातो. यामुळे रशिया व तुर्कीमधील तणाव अधिक चिघळण्याचे संकेत विश्लेषकांनी दिले आहेत.

लष्करी सहकार्य

गेल्या आठवड्यात तुर्कीच्या इस्तंबूल शहरात झालेल्या बैठकीत तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्दोगन व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी लष्करी सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या करारांमध्ये दोन देशांमधील संरक्षण उद्योगांमधील सहकार्य वाढविण्याच्या तसेच लष्करी संबंधांची चौकट निश्चित करणाऱ्या करारांचा समावेश आहे. तुर्की व युक्रेनमध्ये झालेले हे लष्करी करार द्विपक्षीय संरक्षण सहकार्यातील मोठा टप्पा मानला जातो. गेल्या वर्षी युक्रेनने तुर्की कडून ड्रोन खरेदी करण्याबाबत मोठा करार केला होता. त्यापाठोपाठ विमानाचे इंजिन विकसित करण्यासाठीही दोन्ही देशांमध्ये बोलणी सुरू आहेत.

ब्लॅक सी क्षेत्रात स्थैर्य व शांतता राखण्याच्या दृष्टीने युक्रेन हा महत्त्वाचा देश आहे, असे तुर्कीला वाटते या शब्दात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी कराराचे समर्थन केले. यावेळी त्यांनी क्रिमियाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. ‘क्रिमियावर बेकायदा ताबा मिळविण्याच्या कृत्याला तुर्कीने कधीही समर्थन दिलेले नाही आणि यापुढे कधीही देणार नाही’, असे एर्दोगन यांनी सांगितले. तुर्की राष्ट्राध्यक्षांची ही भूमिका रशियाला उघड आव्हान देणारी ठरते.

गेल्या काही वर्षांत रशियाचे तुर्कीबरोबरील संबंध संमिश्र स्वरूपाचे राहिले आहेत. रशियाकडून शस्त्रास्त्रे व इंधन खरेदी करणारा तुर्की, सिरिया तसेच लिबियात रशियन हितसंबंधांविरोधात खडा ठाकला आहे. तरीही सध्या रशियाने इतर मुद्यांवर तुर्कीशी असलेले सहकार्य रोखलेले नाही. मात्र आर्मेनिया-अझरबैजान युद्धातील तुर्कीची भूमिका पुतिन यांच्या सहनशीलतेची कसोटी घेणारी ठरली आहे. ते उघडपणे तुर्की व त्याच्या हितसंबंधांविरोधात संघर्षाचा निर्णय घेऊ शकतात, असा इशारा रशियन विश्लेषक देत आहेत. या पार्श्वभूमीवर तुर्कीने पुतिन यांच्यासाठी संवेदनशील मुद्दा मानल्या जाणाऱ्या युक्रेन व क्रिमियाबाबत घेतलेली आक्रमक भूमिका रशिया व तुर्कीमधील उघड संघर्षाचे कारण ठरू शकते, असे मानले जाते.

leave a reply