चोवीस तासात जगभरात कोरोनाचे लाखाहून अधिक रुग्ण सापडले

वॉशिंग्टन – गेल्या चोवीस तासात जगभरात कोरोनाव्हायरसमुळे सात हजाराहून अधिक जणांचा बळी गेला असून या साथीचे तब्बल एक लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. यातील दोन तृतीयांश रुग्ण अमेरिका, रशिया, ब्राझील आणि भारतातील असल्याची माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, वर्ल्डओमीटर, युरोपीय महासंघ आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात जगभरात कोरोनाव्हायरसच्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. या चोवीस तासात जगभरात ७,४०० हून अधिक जण दगावले असून १,०६,६६२ जणांना या साथीची लागण झाली आहे. युरोपसह काही देशांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लॉकडाउन शिथिल केल्यामुळे कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचा दावा केला जातो.

या महामारीमुळे अमेरिकेत बुधवारी १,५६१ जणांचा बळी गेला तर २४ हजाराहून अधिक इतक्या संख्येने या साथीचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर युरोपमध्ये गेल्या चोवीस तासात १,७०० हून अधिक जण दगावले. तर चोवीस तासात युरोपात अठरा हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी इटलीमध्ये सर्वाधिक ५,६३०, ब्रिटनमध्ये २,६१५ रुग्ण आढळले आहेत. ब्राझिलमधील कोरोनाच्या साथीने दगावलेल्यांची आणि रुग्णांची संख्या भयावहरित्या वाढत चालली आहे. बुधवारी ब्राझीलमध्ये ९११ जणांचा या साथीने मृत्यू झाला असून एकाच दिवसात वीस हजाराहून नवे रुग्ण अधिक संख्येने आढळले आहेत. तर रशियात दिवसभरात १२७ जणांचा बळी गेला असून या देशात साथीच्या ८,८४९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, या साथीबाबत लपवाछपवी करणाऱ्या चीनकडून जबर नुकसान भरपाई वसूल करण्याची तयारी अमेरिकेने केली आहे. त्याचबरोबर, अमेरिकेने चीनची व्यापारी आणि लष्करी स्तरावर कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. चीनबरोबरचे संबंध विकोपाला जात असताना अमेरिकेने रशियाबरोबर विशेष सहकार्य प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने रशियाला दोनशे व्हेंटिलेटर्स देऊ केले असून यातील पहिले पन्नास व्हेंटिलेटर्स गुरुवारी रशियात उतरविण्यात आले. अमेरिकेने दिलेल्या या वैद्यकीय सहाय्याचे रशियाने स्वागत केले. तर, या संकटाच्या काळात अमेरिका आणि रशियाने जीवितहानी टाळण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया रशियातील अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्ता रिबेका रॉस यांनी दिली आहे.

leave a reply