सुदानच्या दर्फूरमधील संघर्षात १५०हून अधिक जणांचा बळी

१५०हून अधिकदर्फूर – सुदानच्या वेस्ट दर्फूर प्रांतात झालेल्या वांशिक संघर्षात १५० हून अधिक जणांचा बळी गेला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. वेस्ट दर्फूरमधील क्रेनिक, जेबेल मून माऊंटन्स व सर्बा या भागात हिंसाचार भडकल्याची माहिती स्थानिक गटांनी दिली. नव्या हिंसाचारामुळे या भागातील १० हजारांहून अधिक जणांना विस्थापित व्हावे लागल्याचे समोर आले आहे.या वर्षाच्या सुरुवातील दर्फूरमधील ‘एल गेनैना’ भागात झालेल्या वांशिक संघर्षानंतर सुदान सरकारला आणीबाणी घोषित करावी लागली होती.

गेल्या महिन्यात जेबेल मून भागातील अरब गटांमध्ये संघर्ष उडाला होता. त्याचे पडसाद इतर भागात उमटण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी क्रेनिक भागात दोन प्रतिस्पर्धी वांशिक गटांमध्ये संघर्षाचा मोठा भडका उडाला. या हिंसाचारात तब्बल ९० जणांचा बळी गेला असून १००हून अधिक जखमी झाल्याची माहिती ‘वेस्ट दर्फूर डॉक्टर्स कमिटी’ या गटाने दिली. सर्बा भागातील संघर्षात आठ जणांचा बळी गेला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती १५०हून अधिकगंभीर असून बळींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या वर्षभरात दर्फूरमध्ये झालेला वांशिक संघर्ष व हिंसाचाराच्या घटना २००३ साली भडकलेल्या संघर्षाशी साधर्म्य दाखविणार्‍या आहेत, असा दावा करण्यात येतो. पाणी, शेती व जमिनीच्या मुद्यावरून स्थानिक आफ्रिकी व अरबवंशियांमध्ये २००३ साली मोठा संघर्ष उडाला होता. त्यावेळी सुदानमध्ये हुकुमशहा ओमर बशिर यांची राजवट होती. बशिर यांनी अरब गटांना पाठिंबा देऊन आफ्रिकीवंशियांचा संहार सुरू केला होता.

दर्फूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी २००७ साली संयुक्त राष्ट्रसंघटनेने शांतीसेना तैनात केली होती. मात्र त्यानंतरही हिंसाचारात विशेष फरक पडलेला नाही, उलट शांतीसेनेवरच हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. १५०हून अधिकजवळपास १५ वर्षे हा भीषण संघर्ष सुरू होता. यात तीन लाखांहून अधिक जणांचा बळी गेला असून २५ लाखांहून अधिक जण विस्थापित झाले आहेत. दर्फूर भागात तैनात केलेल्या शांतीसेनेची मुदत गेल्या वर्षाच्या अखेरीस संपली असून या भागात आता सुदानी लष्कर तैनात करण्यात आले आहे.

सुदानमध्ये गेल्या वर्षी बशिर यांची राजवट उलथून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. त्यानंतर देशात राजकीय हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेदरम्यान दोनदा लष्करी बंडाच्याही घटना घडल्या आहेत. त्याचवेळी शेजारी देश इथिओपियाबरोबर सीमावादही भडकण्याचे संकेत मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर दर्फूरमधील नवा हिंसाचार सुदानमध्ये नव्या अस्थैर्याला कारणीभूत ठरु शकतो, अशी चिंता विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply